Sharad Pawar, Girish Bapat: कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद विसरा; शरद पवारांसमोरच गिरीश बापटांनी ठेवले ठाकरे सरकारच्या दुखण्यावर बोट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 12:31 PM2022-05-09T12:31:05+5:302022-05-09T12:31:44+5:30
Sharad Pawar, Girish Bapat Speech in Pune: राष्ट्रवादीचे प्रवक्ता अंकुश काकडे यांच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखमालेचे उत्कर्ष प्रकाशनाने ‘हॅशटॅग पुणे’ हे पुस्तक तयार केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ललित साहित्य प्रकाशनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली असून, पुण्यासाठी व महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे. साहित्य आणि संस्कृतीच्या योगदानावर समाजाची उंची वाढत असते. भौतिक विकासापेक्षा समाज वैचारिक, सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या प्रगत होणे गरजेचे आहे. त्यासाठी साहित्य व्यवहार व वाचन संस्कृतीत वाढ होणे आवश्यक आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे प्रवक्ता अंकुश काकडे यांच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखमालेचे उत्कर्ष प्रकाशनाने ‘हॅशटॅग पुणे’ हे पुस्तक तयार केले. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, गिरीश बापट, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, राजकारणात मतभेद आणि वैचारिक भिन्नता असते. परंतु, त्या मतभेदांचे आणि मतभिन्नतेचे रूपांतर मनभेदामध्ये होता कामा नये. राजकीय नेतृत्व आणि कार्यकर्त्यांनी सुसंस्कृत भूमिका घेऊन आदर्श प्रस्थापित केला पाहिजे.
लोकप्रतिनिधी झालो म्हणजे आपण सर्वसामान्यांपासून वेगळे झाल्याचे समजू नका, असे सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना गिरीश बापट यांनी मनोगतात सुनावले. तसेच अनेकांसाठी आताचे राजकारण हाच व्यवसाय झाला असल्याची खंतही व्यक्त केली.
कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद विसरा...
- अंकुश काकडे आणि माझे महापालिकेपासून मैत्रीपूर्ण संबंध. आमची राजकीय गाडी आता शेवटापर्यंत गेली. अंकुश काकडे यांचा पुढील राजकीय प्रवास शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नक्की होईलच; परंतु काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेचे आमदारपद देऊ नये.
-कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आहेत, तोपर्यंत विधान परिषदेवर आमदार निवडून जातील, याची खात्री देता येत नाही, असे खासदार गिरीश बापट यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.
मी बापट, तो पोपट...
गिरीश बापट आणि अंकुश काकडे यांची मैत्री सर्वांनाच माहीत आहे. रविवारी अंकुश काकडे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभप्रसंगी खासदार गिरीश बापट यांनी काकडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडवून दाखवले. त्यावेळी बापट म्हणाले, मी बापट असलो तरी तो पोपट आहे. बोलतो चांगला आणि लिहितोही चांगला. हे हॅशटॅग पुस्तकावरून स्पष्ट होते, असे सांगत काकडे यांचे कौतुकही केले.