जाहिराती संकेतस्थळावर टाकण्याचा विसर
By admin | Published: April 3, 2017 01:00 AM2017-04-03T01:00:50+5:302017-04-03T01:00:50+5:30
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्याच्या निर्णयाची ३ वर्षांनंतरही अंमलबजावणी करण्यात विद्यापीठाला अपयश आले
दीपक जाधव,
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ३००पेक्षा जास्त महाविद्यालयांतील प्राध्यापक भरतीच्या सर्व जाहिराती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्याच्या निर्णयाची ३ वर्षांनंतरही अंमलबजावणी करण्यात विद्यापीठाला अपयश आले आहे. देशभरातील व बहुतांश सर्व विद्यापीठे त्यांच्या संकेतस्थळावर या जाहिराती प्रकाशित करीत असताना, पुणे विद्यापीठाला मात्र त्याचा विसर पडल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मार्च २०१४ मध्ये विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांतील प्राध्यापक भरतीच्या जाहिराती संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाव्यात, असा ठराव केला होता. त्यानंतर लगेच या निर्णयाची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात ३ वर्षे उलटली, तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक पदाच्या जागा रिक्त झाल्यानंतर, तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये त्याची जाहिरात दिली जाते; मात्र अनेकदा या जाहिरातींची माहिती प्राध्यापक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीच्या जाहिरातींची एकाच ठिकाणी माहिती मिळावी, यासाठी देशभरातील बहुतांश विद्यापीठे ती जाहिरात संकेतस्थळावर प्रकाशित करतात; मात्र पुणे विद्यापीठामध्ये त्या प्रकाशित केल्या जात नव्हत्या.
विद्यार्थ्यांनी त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर, व्यवस्थापन परिषदेने रितसर ठराव करून संलग्न सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापक पदाच्या जाहिराती संकेतस्थळावर टाकण्याचा निर्णय घेतला; मात्र ३ वर्षे उलटल्यानंतरही या ठरावाची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.
>पात्र विद्यार्थी राहतात नोकरीपासून वंचित
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयांच्या प्राध्यापक भरतीच्या जाहिराती संकेतस्थळावर उपलब्ध होत नसल्याने अनेक नेट/सेट उत्तीर्ण झालेल्या पात्र
विद्यार्थ्यांपर्यंत त्याची माहितीच मिळत नसल्याने त्यांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. आपल्या मर्जीतील उमेदवारांची प्राध्यापकपदी वर्णी लावू इच्छिणाऱ्या संस्थाचालकांचा यामुळे चांगलाच फायदा
होत आहे.
महाविद्यालयामध्ये प्राध्यापक पदाची जागा रिक्त झाल्यानंतर, ते पद भरण्याकरिता महाविद्यालयाच्या व्यवस्थापनास विद्यापीठाकडून मान्यता घ्यावी लागते.
त्यामुळे संलग्न महाविद्यालयांमध्ये भरल्या जात असलेल्या पदांची सर्व माहिती विद्यापीठाकडे असते. ही माहिती केवळ संकेतस्थळावर प्रसिद्ध
करणे एवढेच काम विद्यापीठाला करायचे आहे.
>राज्यातील इतर विद्यापीठांच्या जाहिराती त्यांना संकेतस्थळावरच पाहायला मिळतात; मात्र पुणे विद्यापीठाच्या जागांची माहिती मिळविण्यासाठी मात्र त्यांना जंगजंग पछाडावे लागत आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, नाशिकचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संकेतस्थळावर अत्यंत चांगल्या पद्धतीने प्राध्यापकभरतीची सविस्तर माहिती दिली जाते.
>दोन आठवड्यांत जाहिराती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील जाहिराती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे, येत्या दोन आठवड्यांत या जाहिराती विद्यार्थ्यांना पाहता येऊ शकतील.
- वासुदेव गाडे, कुलगुरू,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ