भाजपच्या माजी आमदारांनी रस्ते कामात पाच कोटी घेतल्याचा आरोप; नगरसेवकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 05:39 PM2021-06-30T17:39:34+5:302021-06-30T17:40:07+5:30
माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी १०७ कोटीच्या रस्ते कामात पाच कोटी घेतल्याच्या आरोप नगरसेवक सागर चाळके यांनी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला.
इचलकरंजी : माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी १०७ कोटीच्या रस्ते कामात पाच कोटी घेतल्याच्या आरोप नगरसेवक सागर चाळके यांनी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. आरोप मागे घेण्याच्या मागणीवरून भाजपा नगरसेवकांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्यासमोर ठिय्या मांडला. तर आरोपावर ठाम असल्याचे सांगत विरोधी नगरसेवकांनीही ठिय्या मारला. त्यामुळे गोंधळात भर पडली. अखेर याबाबत निषेध व्यक्त करून कामकाज पूर्ववत सुरू केले.
विविध ७३ व ऐनवेळच्या पाच विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या. सभेत भगतसिंग उद्यानामध्ये खासगी ठेकेदारामार्फत बुलेट ट्रेन बसविण्याच्या विषयावर नगरसेवक शशांक बावचकर यांनी यापूर्वी बागेत बसविलेल्या ट्रेनचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला. तसेच सदर कामाच्या चौकशीची मागणी केली.
यावरून नगरसेवक चाळके यांनी १०७ कोटींच्या कामात माजी आमदार हाळवणकर यांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी चाळके यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून, तो आरोप मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी केली. मात्र, चाळके हे आपल्या आरोपावर ठाम राहिल्याने भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यामुळे सभागृहात जोरदार गोंधळ उडून तणाव निर्माण झाला. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा स्वामी यांच्यासमोर ठिय्या मारून आरोप मागे घेईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यांच्यापाठोपाठ चाळके यांच्यासह विरोधी नगरसेवकांनीही नगराध्यक्षांसमोर ठिय्या मारल्याने गोंधळात भर पडली.
भाजपचे पक्षप्रतोद तथा उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी चाळके यांच्या आरोपाचा निषेध करत सभागृहाचे कामकाज सुरू करण्याची मागणी केली. त्यावर चाळके यांनी, चुकीच्या गोष्टींना पांघरूण घालत असाल तर त्याला माझा विरोध असून आपण निषेध करत असल्याचे सांगितले. कॉँग्रेसचे नगरसेवक बावचकर यांनी, १०७ कोटींच्या कामाची ईडीमार्फत चौकशी करण्यासाठी सभागृहात ठराव करावा, अशी मागणी केली.