...म्हणून माझं तिकीट कापलं; भाजपाचे माजी आमदार राजू तोडसाम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 04:41 PM2021-11-11T16:41:12+5:302021-11-11T16:41:42+5:30

तोडसाम यांच्या पक्ष प्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी बळकटी मिळेल असं जयंत पाटील म्हणाले.

Former BJP MLA Raju Todsam joins NCP presence of Jayant patil, Todsam target on Devendra Fadnavis | ...म्हणून माझं तिकीट कापलं; भाजपाचे माजी आमदार राजू तोडसाम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

...म्हणून माझं तिकीट कापलं; भाजपाचे माजी आमदार राजू तोडसाम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

googlenewsNext

मुंबई – २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात विरोधी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीतून पक्षांतर झालं होतं. भाजपात मेगाभरती सुरु होती. परंतु राज्यात सत्तांतर झालं आणि आता भाजपाला गळती लागल्याचं चित्र दिसून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी विधासभा मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला. आदिवासी समाजाचा एक प्रामाणिक, होतकरु नेता राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी समाधान व्यक्त केले. तसेच राजू तोडसाम यांच्या पक्ष प्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी बळकटी मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच भाजपामध्ये जुन्या नेत्यांना डावलले जात आहे. त्यातूनच तोडसाम यांच्यासारखा नेता आज आपल्या पक्षात प्रवेश करत आहे, याचा आनंद वाटतोय, असेही जयंत पाटील म्हणाले.

माजी आमदार राजू तोडसाम(Raju Todsam) यावेळी म्हणाले की, मी भाजपामध्ये १० वर्ष काम केले. सर्वांना सोबत घेऊन गेलो. मला २०१४ साली आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सत्ताधारी पक्षात काम करत असलो तरी विधानसभेत जयंत पाटील यांचे भाषण आवर्जून ऐकायचो. विरोधकांनाही मी मानसन्मान देत होतो. तसेच आदिवासींच्या प्रश्नावर वारंवार आवाज उचलत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी माझे तिकीट २०१९ च्या निवडणुकीत कापले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फडणवीस यांनी मला बोलावून पक्षात थांबायला सांगितले. मात्र मी राष्ट्रवादीतच प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजपा सोडत असताना माझ्या मागे ईडी लागेल याची मला चिंता नाही. मी आदिवासी माणूस असून माझ्याकडे काहीच नाही. चौकशी केली तरी काही सापडणार नाही असेही स्पष्ट केले.

यवतमाळमधील पुसद विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांच्यासोबत या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, माजी आमदार संदीप बाजोरीया, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख आदी उपस्थित होते.

Web Title: Former BJP MLA Raju Todsam joins NCP presence of Jayant patil, Todsam target on Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.