भाजपला मोठा धक्का! सुधाकर भालेराव यांचा शरद पवार गटात प्रवेश; 'या' आमदाराला देणार आव्हान?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 01:06 PM2024-07-11T13:06:08+5:302024-07-11T13:06:58+5:30
sudhakar bhalerao : सुधाकर भालेराव यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
मुंबई : राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पक्षाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे सुधाकर भालेराव यांनी स्वत: भाजपच्या कार्यालयाला भेट देऊन हा राजीनामा दिला. त्यानंतर सुधाकर भालेराव यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे यांच्या उपस्थितीत सुधाकर भालेराव यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राज्यातील विधानसभेच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सुधाकर भालेराव हे उदगीर राखीव मतदार संघातून भाजपचे सलग दोन वेळा आमदार होते.
२०१९ च्या निवडणुकीत भाजपने सुधाकर भालेराव यांना डावलले आणि परभणी येथील डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संजय बनसोडे हे विजयी झाले. संजय बनसोडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असून सध्या ते क्रीडामंत्री आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची अजित पवार यांच्या राष्ट्रावादीसोबत युती असल्यामुळे संजय बनसोडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. त्यामुळे भाजपकडून आगामी विधानसभेसाठी आपल्याला संधी मिळणार नाही, हे निश्चित झाल्यानंतर सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.
महाविकास आघाडीत उदगीरची जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उदगीरमध्ये राष्ट्रवादीचे संजय बनसोडे व शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.