सर्कशीत आता प्राणी नसतात, सर्व जोकर असतात; माजी मुख्यमंत्र्यांचं शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 04:51 PM2020-06-11T16:51:13+5:302020-06-11T16:54:22+5:30
शरद पवारांनी आमच्या सर्कशीत प्राणी आहेत पण विदूषकाची कमतरता आहे असं सांगत टोला लगावला होता. त्यावर पत्रकारांनी आज देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी पवारांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.
रायगड – सर्कशीत पहिले प्राणी होते, पण आता फक्त जोकर राहिलेत हे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना माहिती होतं, त्यासाठीच त्यांनी महाराष्ट्रातील विद्यमान सरकारला सर्कस संबोधलं अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस कोकणात गेले आहेत, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते, अलीकडेच राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र सरकारला सर्कस म्हटलं होतं. त्यावर शरद पवारांनी आमच्या सर्कशीत प्राणी आहेत पण विदूषकाची कमतरता आहे असं सांगत टोला लगावला होता. त्यावर पत्रकारांनी आज देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी पवारांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पवारसाहेबांना सध्याच्या सर्कशीबद्दल माहिती नाही, मागील १५-२० वर्षापासून सर्कशीत प्राणी राहिले नाहीत, आता सर्कस जोकरांच्या भरवशावर चालते, राजनाथ सिंह यांना ही गोष्ट माहिती होती म्हणून त्यांनी ते विधान केले असं ते म्हणाले.
तसेच याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता, मी विदर्भामधला आहे, त्यामुळे समुद्राशी काहीही संबंध नाही असं शरद पवार म्हणाले आहे. पण मी अनेकदा बारामतीत गेलो, तिथे मला समुद्र दिसला नाही असा टोला त्यांनी पवारांना लगावला. त्याचसोबत शरद पवार माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यामुळे मुलगा कितीही पुढे गेला तरी बापाला असं वाटतं की त्याला कमी समजतं. शरद पवरांना माझ्या खांद्यावरुन वांद्र्याचे सीनियर आणि बारामतीच्या ज्युनियर यांच्यावर बंदुक चालवायची आहे, असं म्हणत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
आमच्या सर्कशीत प्राणी आहे फक्त विदूषकाची कमतरता आहे अशा शब्दात त्यांनी राजनाथ सिंहावर टीका केली होती. तर कोकणात किती नुकसान झालं आहे, हे सर्वांना कळलं पाहिजे. प्रत्येकजण वेगवेगळ्या भागतून येतो. मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत, तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
भारताविरुद्ध चीनचा माईंडगेम! लडाख सीमेवर आणल्या अत्याधुनिक ‘बाहुबली तोफ’
त्या’ १३ तासांत काय घडलं? गर्भवती महिलेच्या पतीने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा थरारक अनुभव!
मुख्यमंत्र्यांनंतर आता ज्योतिरादित्य शिंदेंची ऑडिओ क्लीप व्हायरल; ५० लाख रुपये दिल्याचा संवाद
काँग्रेस आमदारांना जयपुरच्या हॉटेलमध्ये पाठवलं; भाजपा आमिष दाखवत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप