माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन; दोनच दिवसांपूर्वी कोरोनावर केली होती मात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 07:56 AM2020-08-05T07:56:35+5:302020-08-05T08:29:26+5:30
16 जुलै रोजी निलंगेकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ९१ वर्षीय डॉ. निलंगेकर हे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.
पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे पुण्यामध्ये निधन झाले. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती.
16 जुलै रोजी निलंगेकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ९१ वर्षीय डॉ. निलंगेकर हे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना कफ वगळता कोरोनाची इतर लक्षणे नव्हती. वय, मधुमेह लक्षात घेता अधिक काळजी घेतली जात होती. १४ जुलैला ताप आला होता, त्यानंतर निलंगा येथून त्यांना लातूरला आणले होते. पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले होते.
निलंगेकर यांनी या वयातही कोरोनावर यशस्वी मात केली होती. त्यांना रुग्णालयातील नाॅन कोरोना वाॅर्डात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान त्यांचे किडनीच्या विकाराने निधन झाले. आज दुपारी २ वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह निलंगा येथे आणला जाणार असून सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
दरम्यान, माजी मंत्री अनिल राठोड यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
नऊ महिने होते राज्याचे मुख्यमंत्री
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा ०९ फेब्रुवारी १९३१ रोजी निलंगा इथे त्यांचा जन्म झाला. ते हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक ही होते. एम.ए., एल.एल.बी. पर्यंत त्याचं शिक्षण झालं होतं. दादासाहेब या नावाने ते सर्वांना सुपरिचित होते. राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदे त्यांनी सांभाळली. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर राज्याचे दहावे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी टाकली. ०३ जून १९८५ ते ०६ मार्च १९८६ असे नऊ महिन्यासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री होते. अतिशय शिस्तप्रिय आणि कडक त्यांचा स्वभाव होता. लातूर जिल्हा निर्मिती, औरंगाबाद खंडपीठ निर्मितीसाठी प्रयत्न केले होते.