पुतण्यानं कोरोना लस घेतल्याच्या वादावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 01:26 PM2021-04-20T13:26:23+5:302021-04-20T13:32:08+5:30
काँग्रेसनं फोटो शेअर करत फडणवीसांवर साधला होता निशाणा
एकीकडे रेमडेसिविरच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यानं ‘कोरोना’ची लस घेतल्याचा फोटो ‘व्हायरल’ झाला होता. त्याचं वय ४५ च्या वर नसतानादेखील त्याला लस कशी काय मिळाली, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान, यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेवर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.
"तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषांप्रमाणे लसीचा डोस देण्यात आला याची मला कल्पना नाही. जे हे नियांमांनुसार झालं असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. परंतु नियमांचं उल्लंघन करु जर हे झालं असेल तर ते अयोग्य आहे," असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे. नियमांनुसार पात्र नसल्यानं माझ्या पत्नीला आणि मुलीलाही लस देण्यात आली नाही. प्रत्येकां नियमांचं पालन करावं हे माझं ठाम मत आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
आमच्याकडे दुसरा डोस, रुग्णालयाचं स्पष्टीकरण
सोशल मीडियावर तन्मय फडणवीस याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली होती. या वादानंतर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी स्पष्टीकरण देताना त्यांनी आपल्याकडे केवळ दुसरा डोस घेतल्याचं म्हटलं. "तन्मय फडणवीस यानं मुंबईतील सेव्हन हिल्स या रुग्णलायात पहिला डोस घेतला. त्यानं कोणत्या निकषांनुसार तो घेतला याची कल्पना नाही. त्यानं आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यावर आमच्या सेंटरमध्ये त्यांना दुसरा डोस देण्यात आला," असं त्यांनी नमूद केलं. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
Dear @Dev_Fadnavis, is your Nephew Tanmay Fadnavis 45+ years old?
— Srivatsa (@srivatsayb) April 19, 2021
If not, how is he eligible for taking the Vaccine?
Just like Remdesivir, are you hoarding Vaccines & giving it to your family members?
People are dying. There is Vaccine Shortage. But Fadnavis family is Safe. pic.twitter.com/6vjwIqNuEI
काँग्रेसनं केली होती टीका
तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय २५ वर्षांहून अधिक नाही. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला. रात्री ‘इन्स्टाग्राम’वरून तो ‘फोटो’ हटविण्यात आला, मात्र तोपर्यंत अनेकांनी ‘स्क्रीनशॉट्स’ घेऊन ठेवले होते. यावरून काँग्रेसने फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं होतं. ४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट असतानादेखील फडणवीसांच्या पुतण्याला लस मिळाली. भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा, मग इतर लोक काय किड्यामुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसने ‘टि्वटर’वर उपस्थित केला.