काँग्रेसचे माजी कार्यकर्ते मनोज जरांगे हे महाराष्ट्राला डिस्टर्ब करतायेत - गुणरत्न सदावर्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 02:30 PM2024-01-16T14:30:01+5:302024-01-16T14:30:41+5:30
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या अधिकारापेक्षा मनोज जरांगे मोठा नाही असा निशाणा सदावर्ते यांनी जरांगे पाटलांवर साधला आहे.
मुंबई - काँग्रेसचे माजी कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राला सातत्याने डिस्टर्ब करत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ले, आस्थापनांची जाळपोळ, गाड्यांची तोडफोड ही मालिका आपण पाहिली आहे. पोलिसांवरील हल्ले आणि गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे अशा शब्दात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. सदावर्ते यांनी हायकोर्टात जरांगे यांच्या मराठा आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर २२ जानेवारीला सुनावणी होणार आहे.
याबाबत गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, २६ जानेवारीला मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार आहे. सांकेतिक भाषेत मनोज जरांगे बोलतो. स्टॉक एक्सचेंज, मंत्रालयला टार्गेट करू असं बोलले जाते. आंदोलनाच्या नावाखाली गलिच्छ राजकारण केले जात आहे. त्यासाठी मनोज जरांगेंना थांबवण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली असून जरांगेवर ३०२ चा गुन्हा दाखल व्हावा. जरांगे यांना अटक करून त्यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी याचिकेतून सदावर्ते यांनी केली आहे.
तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या अधिकारापेक्षा मनोज जरांगे मोठा नाही. भारताच्या संविधानापेक्षा जरांगे मोठा नाही. जरांगे हे कुठल्याप्रकारे जातीचं नेतृत्व करून इतरांवर अन्याय करू शकत नाहीत. दोन जातीत तेढ निर्माण करण्याची मुभा जरांगे पाटील यांना नाही. हिंसक आंदोलनाला भारतीय संविधान मान्यता देत नाही. जरांगेंचा किस्सा आज न्यायालयात ऐकवला गेला. गाड्या फोडणे, घरं जाळली जातात. कशाप्रकारे पीडितांना टार्गेट केले जाते ते न्यायालयात सादर केले. जरांगे मुंबईत येऊन इथली शांतता भंग करणार आहेत असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
दरम्यान, सोलापूरच्या माळी समाजाच्या मुलाच्या मृत्यूला मनोज जरांगे पाटील जबाबदार आहेत. आम्ही पुराव्यासह न्यायलयासमोर आलो आहोत. न्यायालयाकडे याविषयी दाद मागितली आहे. सोशल मीडियावर ही आत्महत्या नाही तर हत्या आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. आदल्या रात्री त्या मुलाला जाळतानाचा व्हिडिओ न्यायालयात समोर आणला आहे. या मुलाची फाशी नाही तर हत्या आहे. पोलीस कारवाई करत नाही असा धक्कादायक आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.