RTI कार्यकर्ता भूपेंद्र वीरा हत्या प्रकरणी माजी नगरसेवक ताब्यात
By Admin | Published: October 17, 2016 12:01 PM2016-10-17T12:01:31+5:302016-10-17T12:01:31+5:30
ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र हिरजी वीरा यांच्या हत्येप्रकरणी काँग्रेसचे माजी नगरसेवक रज्जाक खान आणि त्यांचा मुलगा अहमद खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र हिरजी वीरा यांच्या हत्येप्रकरणी काँग्रेसचे माजी नगरसेवक रज्जाक खान आणि त्यांचा मुलगा अहमद खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रामुख्याने पश्चिम उपनगरातील अनधिकृत बांधकामे व भूमाफिया यांच्याविरुद्ध सातत्याने आवाज उठविणारे भूपेंद्र वीरा यांची शनिवारी रात्री वाकोल्यातील कलिना मशीदजवळील राहात्या घरी गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली.
वीरा हे घरात टीव्ही पाहात बसलेले असताना हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी एक पुंगळी मिळाली असून, ती फोरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचा सामाजिक संघटना व आरटीआय कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. वीरा यांनी भूमाफियांविरुद्ध सुरू केलेल्या लढाईमुळे त्यांच्याकडून हे कृत्य केले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भांडी बनविण्याचा व्यवसाय असलेले भूपेंद्र हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्यरत होते. विशेषत: परिसरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण, भूमाफिया व बेकायदेशीर कामांविरुद्ध ‘आरटीआय’च्या माध्यमातून पुरावे जमवत सातत्याने आवाज उठवित होते. महापालिका, म्हाडा, एसआरएच्या गैरकारभाराबाबत ते लोकायुक्त, मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयापर्यंत निवेदन देत त्यांचा पाठपुरावा करीत होते. ते ‘व्हाइस आॅफ कलिना एएलएम’ या संस्थेचे सक्रिय पदाधिकारी होते. त्यांच्यामुळे या परिसरातील अनेक अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांविरुद्ध प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले होते. त्यामुळे दुखावले गेलेल्या बिल्डर, माफियांकडून त्यांना अनेकवेळा धमक्या येत होत्या. त्याबाबत वीरा यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र धमक्यांना न घाबरता ते सामाजिक कार्यात सक्रिय होते.
शनिवारी रात्री ते सांताक्रुझ (पूर्व) वाकोला येथील कलिना मशीदच्या मागे असलेल्या रज्जाक चाळीतील रूम नं. ३/८ या आपल्या घरी बेडरूममध्ये टीव्ही बघत बसलेले होते. त्यांची पत्नी रंजना या किचनमध्ये काम करीत होत्या. पावणे दहा ते दहाच्या सुमारास सहा जण थेट त्यांच्या खोलीत शिरले. ते त्यांना अटकाव करेपर्यंत त्यापैकी एकाने त्यांच्या मस्तकावर गोळी झाडली. भूपेंद्र रक्तबंबाळ होऊन कोसळल्यानंतर हल्लेखोर निघून गेले. पत्नी रंजना यांनी आरडाओरड करीत शेजाऱ्यांना तसेच कुर्ला येथील काजुपाडा पाइपलाइनजवळ राहात असलेली मुलगी व जावई सुधीर गाला यांना कळविले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झालेले होते.
निपचिप पडलेल्या वीरा यांना खासगी वाहनातून व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भूपेंद्र वीरा यांच्या हत्येचे वृत्त समजताच घटनास्थळ व रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी मोठी गर्दी केली.
जागामालकाशी रज्जाक खान यांच्याशी वाद :
भूपेंद्र वीरा राहात असलेल्या खोलीचे जागा मालक रज्जाक अब्बास खान याच्याशी त्यांचा जमिनीच्या हक्कावरून वाद सुरू होता. त्याबाबत आलेल्या धमक्यांविरुद्ध त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्याचप्रमाणे खान याच्या अनधिकृत बांधकामाबाबत लोकायुक्तांनी महापालिकेला त्यावर कारवाई करण्याची सूचना केल्यानंतर शनिवारी पालिकेने त्याबाबत नोटीस पाठविली होती. त्यामुळे वीरा हे आनंदात होते. मात्र रात्रीच त्यांची मारेकऱ्यांनी हत्या केली. हत्येच्या घटनेनंतर जागा मालक रझाक खान हा तातडीने प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात अॅडमिट झाला आहे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची चर्चा सुरू आहे.
दोन-तीन फुटांवरून गोळी
भूपेंद्र यांच्यावर जेमतेम २ ते ३ फुटांच्या अंतरावरून गोळी झाडण्यात आली असून, त्यांच्या कपाळाच्या उजव्या बाजूने डोक्यात घुसून डाव्या कानाच्या वरच्या बाजूने बाहेर पडली. खोलीच्या एका कोपऱ्यात पुंगळी मिळाली असून, सर्व खोलीत रक्ताचे डाग पडले होते.
सायलेन्ट रिव्हॉल्व्हरमधून हत्या
आरटीआय कार्यकर्ते वीरा राहात असलेली चाळ ही नेहमी गर्दीने गजबजलेली असते. या ठिकाणी दाटीवाटीने लोक राहतात. मात्र मारेकरी निघून जाईपर्यंत कोणालाही हल्ल्याची कल्पना आली नाही. त्याचप्रमाणे हत्येवेळी त्यांची पत्नी रंजना या दुसऱ्या खोलीत असताना त्यांनाही गोळीबार झाल्याचा आवाज आला नाही. त्यामुळे हल्लेखोरांनी सायलेन्सर बसविलेली रिव्हॉल्व्हर वापरली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भूपेंद्र यांच्या ४०हून अधिक तक्रारी
अनधिकृत बांधकामे व भूमाफियांविरुद्ध तसेच महापालिका, म्हाडा, एसआरएतील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ते सातत्याने आवाज उठवित होते. त्यामुळे त्यांना आजवर किमान ३५ ते ४० वेळा धमक्या आल्या होत्या. त्याबाबत त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. पोलीस मात्र केवळ अदखलपात्र (एनसी) नोंदवून घेत, मात्र संबंधितांवर काहीच कारवाई केली नाही. त्याचप्रमाणे भूपेंद्र यांना संरक्षण पुरविण्यात कधीच स्वारस्य दाखविले नसल्याचा आरोप त्यांचे सहरी कमलाकर शेणॉय यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.