माजी नगरसेवकाला चोरीप्रकरणी अटक
By Admin | Published: April 25, 2017 01:44 AM2017-04-25T01:44:45+5:302017-04-25T01:44:45+5:30
दहिसरमध्ये एक मोकळी जागा बळकावल्याप्रकरणी माजी नगरसेवक आणि नामांकित बिल्डरवर सोमवारी गुन्हा दाखल करत त्याला अटक
मुंबई : दहिसरमध्ये एक मोकळी जागा बळकावल्याप्रकरणी माजी नगरसेवक आणि नामांकित बिल्डरवर सोमवारी गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. मात्र त्या जागेची संबंधित कागदपत्रे त्याच्याकडे असून, हे आरोप खोटे असल्याचे बिल्डरचे म्हणणे आहे.
समीर शेख असे या प्रकरणातील तक्रारदाराचे नाव आहे. दहिसर पूर्व जकात नाका परिसरात एक जागा आहे. ही जमीन शेखच्या मालकीची असल्याचे त्याचे म्हणणे आहे. मात्र ही जागा सहा महिन्यांपूर्वी शेखच्या वडिलांकडून बिल्डरने विकत घेतल्याचे तसेच यातील सर्व कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केल्याचे या बिल्डरचे म्हणणे आहे. या जागेवर बसणाऱ्या शेखच्या माणसांनादेखील हा बिल्डर पगार देत होता.
शुक्रवारी या बिल्डरने त्या जागेवर स्वत:च्या नावाचा बोर्ड लावला. त्यानंतर शनिवारी त्याने स्वत:चे एक आॅफिसदेखील थाटले. या प्रकरणी शेखने दहिसर पोलिसांकडे जाऊन तक्रार केली. ज्यात माझ्या माणसांना बिल्डरच्या लोकांनी जागेवरून हाकलून दिले तसेच बळजबरीने त्यांच्या जागेवर कब्जा केल्याचे शेखचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिसांनी बिल्डर, माजी नगरसेवकासह जवळपास ३५ लोकांना अटक केली आहे. तसेच अधिक चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)