"फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 07:51 PM2021-03-05T19:51:02+5:302021-03-05T19:55:41+5:30
भाजप सरकारने दूरदृष्टी ठेवून आखलेल्या धोरणांमुळे जनतेला स्वस्त वीज उपलब्ध होणार, माजी ऊर्जामंत्र्यांचा दावा
"देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांमुळेच १ एप्रिलपासून वीज ग्राहकांना २ टक्के स्वस्त दराने वीज मिळणार आहे. सत्ताधाऱ्यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये," असा टोला माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
"देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पुढील पाच वर्षातील वीज उत्पादन व खरेदी संदर्भातील अहवाल वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची पद्धत सुरू झाली. त्यानुसार ऑक्टोबर २०१९ मध्ये हा अहवाल आयोगासमोर सादर केला. या अहवालाला मार्च २०२० मध्ये आयोगाने मंजूरी दिली. या अहवालात १ एप्रिल २०२१ पासून वीजदर २ टक्क्यांनी कमी करता येईल असे नमूद केले होते. ग्राहकांना स्वस्त वीज उपलब्ध व्हावी यासाठी फडणवीस सरकारच्या काळात अवलंबलेल्या धोरणाचे हे फलित आहे," असं बावनकुळे म्हणाले.
फडणवीस सरकार सत्तेत असताना पाच वर्षाच्या कालावधीत ऊर्जा खात्याच्या धोरणात बदल करताना भारनियमन मुक्त महाराष्ट्र, पायाभूत सोयी-सुविधांचा विकास असे धोरण ठेवून निर्णय घेतले गेले. राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवत ज्या कंपनीचा वीज दर कमी आहे त्या कंपनीकडूनच वीज विकत घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे महावितरण, महा पारेषण या वीज कंपन्यांची कार्यक्षमता वाढली. परिणामी कंपन्यांचाही नफा होऊ लागल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप सरकारने दूरदृष्टी ठेवून आखलेल्या धोरणांमुळे जनतेला १ एप्रिल पासून २ टक्के स्वस्त दराने वीज उपलब्ध होणार आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.