माजी ग्रामपंचायत सदस्य सायकर अपघातात ठार
By admin | Published: May 14, 2014 06:00 AM2014-05-14T06:00:17+5:302014-05-14T06:00:17+5:30
उरुळी कांचन येथे झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातांत लोणी काळभोरचे माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश सायकर मृत्युमुखी पडले असून, यामध्ये एक जण गंभीर, तर एक किरकोळ जखमी झाला आहे
लोणी काळभोर : उरुळी कांचन येथे झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातांत लोणी काळभोरचे माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश सायकर मृत्युमुखी पडले असून, यामध्ये एक जण गंभीर, तर एक किरकोळ जखमी झाला आहे. पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात १२ मे रोजी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन गावाच्या हद्दीत चौधरी माथ्याजवळ प्रयागधाम फाटा येथे झाला असून, यामध्ये लोणी काळभोरचे माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश बबन सायकर (वय ४८, रा. सायकरवस्ती, माळीमळा, लोणी काळभोर) हे मृत्युमुखी पडलेले असून, त्यांचे मित्र तात्यासाो एकनाथ काळभोर (वय ४५, रा. पांढरीमळा) हे गंभीर जखमी आहेत. या दोघांना धडक दिलेले यश बाळासाहेब कुलकर्णी (वय २४, रा. आनंदग्राम ई ३/८, यवत, ता.दौंड) हे किरकोळ जखमी झाले आहेत. तात्यासाो काळभोर यांची शेती खामगाव (ता. दौंड) या ठिकाणी असल्याने ते आपले मित्र अंकुश सायकर यांच्या समवेत क्लुझर एमएच १२ बीक्यू २८१ यावरून शेतीकडे १२ मे रोजी निघाले होते. ते दोघे ८.४५ वाजण्याच्या सुमारास प्रयागधाम फाटा येथे आले. त्या वेळी समोरून यश कुलकर्णी हे आपली दुचाकी हिरो होंडा सीडी डिलक्स एमएच १२ के एच ७७३वरून भरधाव वेगाने आले व त्यांनी काळभोर यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात तिघेही महामार्गावर पडल्याने सायकर यांच्या डोक्यास गंभीर जखम झाली, तर काळभोर यांचा डावा पाय मोडला व कुलकर्णी यांना किरकोळ जखमा झाल्या. अपघात होताच त्यांना तातडीने हडपसर येथील खासगी रुग्णालयात तातडीने उपचारांसाठी पाठवण्यात आले. आज (१३ मे) रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास सायकर यांचे उपचार चालू असताना निधन झाले. सायकर यांच्या मागे वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.