माजी आरोग्यमंत्र्यांचा ‘हॉर्वर्ड’कडून सन्मान
By admin | Published: July 3, 2015 03:36 AM2015-07-03T03:36:00+5:302015-07-03T03:36:00+5:30
हॉर्वर्ड हेल्थ मिनिस्ट्रियल फोरमच्या वतीने जगातील आरोग्यमंत्र्यांची चौथी परिषद बोस्टन येथे नुकतीच झाली. त्यासाठी महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना
मुंबई : हॉर्वर्ड हेल्थ मिनिस्ट्रियल फोरमच्या वतीने जगातील आरोग्यमंत्र्यांची चौथी परिषद बोस्टन येथे नुकतीच झाली. त्यासाठी महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना विशेष ‘रिसोर्स पर्सन’ म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्या परिषदेने काय दिले, याविषयीचे सविस्तर पत्र ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून देणार आहेत.
जगभरात आरोग्याच्या क्षेत्रात कोणते बदल होत आहेत, कोणते नवीन प्रयोग होत आहेत, औषधे खरेदी प्रक्रियेत काय बदल होत आहेत, ती पारदर्शक होण्याच्या दृष्टीने कोणती राज्ये, देश काय पावले उचलत आहेत, याविषयी विविध देशांच्या व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची परिषद बोस्टन येथे दरवर्षी आयोजित करण्यात येते. गेल्या वर्षी मार्डचे कामबंद आंदोलन आणि विधिमंडळ अधिवेशन यामुळे शेट्टी परिषदेस जाऊ शकले नव्हते.
या वर्षी त्यांना पुन्हा या परिषदेचे निमंत्रण त्यांच्या व्यक्तिगत ईमेलवर आले. तेव्हा आता आपण आरोग्यमंत्री नाही, डॉ. दीपक सावंत हे आरोग्यमंत्री असून त्यांच्याशी संपर्क साधा, असा ईमेल शेट्टी यांनी पाठवला. मात्र याच्या उत्तरादाखल आलेल्या ईमेलमध्ये आपल्या ‘प्रॉक्युरेमेंट पॉलिसी’बद्दल आपणच येथे येऊन माहिती द्यावी, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार शेट्टी हे परिषदेस उपस्थित राहिले.
महाराष्ट्रात सुरेश शेट्टी यांनी केलेले काम माहीत असल्यामुळेच या परिषदेसाठी निमंत्रण देण्यात येत असल्याचे आयोजकांतर्फे सुरेश शेट्टी यांना कळविण्यात आले.
या पाच दिवसीय परिषदेस केनडी स्कूल आॅफ गव्हर्नमेन्ट आणि
हॉर्वर्ड स्कूल आॅफ हेल्थ, वर्ल्ड बँक आदींचे अधिकारी सहभागी होते. वरिष्ठ अधिकारी पूर्णिमा मेनन यांनी भारतातर्फे सादरीकरण केले तर शेट्टी यांनी महाराष्ट्राने आरोग्य विभागात केलेल्या सुधारणा सांगितल्या. त्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेपासून ब्लड आॅन कॉल, शिशुसुरक्षा योजनेपर्यंतची माहिती त्यांनी दिली.
आरोग्य या विषयावर जगाचा विचार आणि आपण काय करत आहोत याचे पत्र आपण मुख्यमंत्र्यांना देणार आहोत, असेही शेट्टी यांनी सांगितले.