ED : अनिल देशमुख यांची पत्नी ईडीच्या चौकशीला गैरहजर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 07:18 AM2021-07-16T07:18:34+5:302021-07-16T07:19:05+5:30
Anil Deshmukh wife ED Enquiry : कोरोना, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी त्यांच्या पत्नी आरती देशमुख चौकशीसाठी गुरुवारी गैरहजर राहिल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रकृतीच्या कारणास्तव त्या कार्यालयात हजर राहू शकत नसल्याचे त्यांच्या वकिलामार्फत कळविण्यात आल्याचे समजते.
अनिल देशमुख यांना तीनवेळा तर त्याचे पुत्र ऋषिकेश यांना ईडीने एकवेळा समन्स बजावले होते. मात्र, त्यांनी चौकशीला हजर राहणे टाळले आहे. आता आरती देशमुखही गैरहजर राहिल्याने ईडी कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. आरती यांना गुरुवारी सकाळी अकरा वाजता बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात हजर राहण्याबाबत बुधवारी समन्स बजावले होते. मात्र, त्यांना विविध आजार आहेत, कोरोनाच्या संसर्गामुळे घराबाहेर पडणे अशक्य आहे, तसेच त्या गृहिणी असून कोणत्याही व्यवसायात सक्रिय नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी कालच स्पष्ट केले होते.