माजी महापौर भिकशेठ पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 11:24 AM2019-11-01T11:24:39+5:302019-11-01T11:57:24+5:30
सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी महापौर भिकशेठ ज्ञानदेव पाटील (वय ७३) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे निधन झाले. पुरोगामी विचारांची मशाल खांद्यावर घेऊन फुले - राजर्षी शाहू - आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या कार्यात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.
कोल्हापूर : सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी महापौर भिकशेठ ज्ञानदेव पाटील (वय ७३) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे निधन झाले. पुरोगामी विचारांची मशाल खांद्यावर घेऊन फुले - राजर्षी शाहू - आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या कार्यात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.
गेल्या दोन अडीच महिन्यांपासून भिकशेठ पाटील आजारी होते. त्यांच्या किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे रक्तात संसर्ग झाला होता. रक्तातील पांढऱ्या पेशीही कमी झाल्या होत्या. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर बनली. येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले.
सन १९९१ मध्ये कोल्हापूरचेमहापौरपद भूषविण्याचा तसेच १९८५ ते १९९५ अशी सलग दहा वर्षे नगरसेवक म्हणून काम करण्याचा बहुमान भिकशेट पाटील यांना मिळाला; परंतु त्यांचा मूळ पिंड हा राजकारणी यापेक्षा सामाजिक कार्यकर्ता असाच होता. त्याही पुढे जाऊन समाजप्रबोधन हाच त्यांचा ध्यास होता. त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता. ऐन तारुण्यात त्यांनी या थोर पुरुषांच्या विचारांना अनुसरूनच आपल्या कार्याला सुरुवात केली.
सुरुवातीची काही वर्षे त्यांनी पत्रकारिता केली. विविध दैनिकांतून त्यांनी वार्ताहर ते उपसंपादकपदाची जबाबदारी सांभाळून उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका स्वीकारली. अत्यंत संवेदनशील मनाच्या पाटील यांनी जेथे अन्याय होतो तेथे संबंधित घटकांना न्याय मिळवून देण्यात पुढाकार घेतला. विधायक संस्था आणि व्यक्ती यांच्यावर त्यांनी सातत्यपूर्ण मौलिक आणि दर्जेदार लेखन केले.
‘कोल्हापूरची मोठी माणसं’, ‘समतेचे धारकरी’, ‘लोकराजा शाहू छत्रपती’ ही प्रबोधन आणि प्रेरणादायी पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. ‘कोल्हापूरची मोठी माणसं’ या पुस्तकाला माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी प्रस्तावना लिहिली. त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
पाटील हे अनेक संस्थांमध्ये कार्यरत होते. राजर्षी शाहू छत्रपती कृतज्ञता प्रतिष्ठानचे ते उपाध्यक्ष होते. ‘लोकराजा राजर्षी शाहू’ ही दूरदर्शन मालिका व चित्रपट निर्मिती करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. दूरदर्शन मालिका निर्मितीचे नियंत्रक या नात्याने त्यांनी तिथे अत्यंत जबाबदारीने काम केले. जिल्हा बालकल्याण संकुल येथे मानद कार्यवाह म्हणून त्यांनी केलेले कार्य त्यांची गरीब, अनाथ मुलांबद्दलची तळमळ सिद्ध करते.
राष्ट्रीय तालीम संघात त्यांनी सरचिटणीस म्हणून काम करून कुस्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. शाहू छत्रपती शिक्षण संस्था येथे संचालक, राष्ट्रीय विचार प्रबोधिनी, कोल्हापूर या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. कोल्हापूर जिल्हा वारांगणा पुनर्वसन संघ, जिल्हा व शहर झोपडपट्टी संघ यांतही पाटील आस्थेने कार्यरत राहिले. ‘समाजप्रबोधनाचा अखंड ध्यास घेऊन काम करणारा कार्यकर्ता’ हीच त्यांची खरी ओळख राहिली.