माजी मंत्री अनिल देशमुख सीबीआयच्या रडारवर, जळगाव प्रकरणात नव्याने एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 07:13 AM2024-09-05T07:13:43+5:302024-09-05T07:15:32+5:30
Anil Deshmukh: भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ‘सीबीआय’ने नवा एफआयआर दाखल केला आहे.
नवी दिल्ली - भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ‘सीबीआय’ने नवा एफआयआर दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना एक पेन ड्राइव्ह दिला होता. त्यात संभाषणांच्या काही फाइल होत्या. त्यांच्या अनुषंगाने सुमारे दोन वर्षे प्राथमिक चौकशी झाल्यानंतर सीबीआयने आता हे पाऊल उचलले आहे.
सीबीआयने नोंदविलेल्या नव्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण तसेच तक्रारदार विजय पाटील यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संगनमत करून निंभोरा जळगाव पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर २०२० रोजी एक झिरो एफआयआर दाखल करण्याचा कट रचला. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज लिमिटेड या शैक्षणिक संस्थेवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रकरणात भाजपचे नेते व अन्य लोकांना गोवण्यासाठी प्रयत्न झाले, असे सीबीआयने केलेल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
‘...म्हणूनच हे कटकारस्थान’
सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांनी भाजपवर हल्लाबोल केला. जनतेचा कौल बघून देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले. अशा धमक्यांना आणि दबावाला मी भीक घालत नाही. न झुकता, न डगमगता मी भाजपच्या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूणगाठ बांधली आहे, असा निर्धार देशमुख यांनी व्यक्त केला.