"राजू शेट्टी हा शेतकऱ्यांनी सोडून दिलेला रेडा"; सदाभाऊ भडकले, शेट्टींनीही सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 03:49 PM2020-08-01T15:49:36+5:302020-08-01T16:19:09+5:30

सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर जहरी टीका; एकेकाळच्या सहकाऱ्यांमध्ये जुंपली

former minister sadabhau khot attacks raju shetty calls him bull | "राजू शेट्टी हा शेतकऱ्यांनी सोडून दिलेला रेडा"; सदाभाऊ भडकले, शेट्टींनीही सुनावले

"राजू शेट्टी हा शेतकऱ्यांनी सोडून दिलेला रेडा"; सदाभाऊ भडकले, शेट्टींनीही सुनावले

googlenewsNext

मुंबई/इस्लामपूर: दूध दरवाढीच्या मुद्यावरून आज राज्यभरात भाजपाकडून आंदोलन सुरू आहे. एकीकडे भाजपाचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत या एकेकाळच्या सहकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. राजू शेट्टी आता काजू शेट्टी झाला आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाल्याची जहरी टीका खोत यांनी केली आहे. खोत यांच्या टीकेला शेट्टी यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दूध दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनात शेतकरीच न दिसल्यानं सदाभाऊ खोत भ्रमिष्ट झाल्याचा पलटवार शेट्टी यांनी केला आहे.

राजू शेट्टी भ्रमिष्ट झाल्याचं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरसंधान साधलं. राजू शेट्टी भंपक माणूस आहे. राजू शेट्टीचा आता काजू शेट्टी झाला आहे. हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाला आहे. प्रत्येक गावात देवाच्या नावानं एक वळू-रेडा सोडलेला असतो. तसा हा रेडा आहे. त्याला शेतकऱ्यांनी सोडून दिलंय. हा रेडा आता दिसेल त्या पिकात तोंड घालू लागला आहे, अशा शब्दांमध्ये खोत यांनी शेट्टींवर घणाघाती टीका केली. 

सदाभाऊ खोत दोन वेळा खासदार करायला त्या रेड्याबरोबर होता. तेव्हा दोन्ही हातांनी सदाभाऊचा गजर सुरू होता. तेव्हा सदाभाऊ चालत होता. पण आता त्यांना सत्ता मिळाली नाही, केंद्रात मंत्रिपदही मिळालं नाही. पण त्यांच्या सहकाऱ्याला मंत्रिपद मिळालं. त्यामुळे लगेच पोटात गोळा आला, अशा शब्दांत खोत यांनी शरसंधान साधलं. आता आंदोलन कशासाठी करता? तुम्हीच सरकारमध्ये आहात. तुम्ही सरकारला पाठिंबा दिला आहे. मग द्या ना शेतकऱ्याला न्याय मिळवून. आंदोलनाची नाटकं कशासाठी करता?, असा सवाल खोत यांनी उपस्थित केला.

राजू शेट्टी माझ्यावर आरोप करतात. या देशात न्यायव्यवस्था आहे. त्यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी न्यायालयात जावं. सदाभाऊनं त्यांच्यासारख्या ३००-४०० एकर जमिनी घेऊन ठेवलेल्या नाहीत. सरकारला आंदोलनाची भीती दाखवून सहकाऱ्यांना पेट्रोल पंप, संस्था काढलेल्या नाहीत, अशी टीका खोत यांनी केली. 

खोत यांच्या टीकेला उत्तर देताना राजू शेट्टींनी दूधदरवाढीच्या आंदोलनाचा फज्जा उडाल्याचं म्हटलं. भाजपाच्या आजच्या आंदोलनाचा फज्जा उडाला आहे. त्यांच्या आंदोलनात शेतकरी कुठेच दिसला नाही. त्यामुळे आता सदाभाऊ खोत भ्रमिष्टासारखे आरोप करत आहेत, असा पलटवार शेट्टींनी केला. तुमचं आंदोलन कोणाविरुद्ध आहे? राज्य सरकारविरुद्ध, राजू शेट्टीविरुद्ध की केंद्राविरुद्ध?, असा सवाल शेट्टींनी विचारला.

दूध प्रश्नावर आंदोलन करता. पण दुधाला दर मिळवून देणं राहिलं बाजूला. हे राजू शेट्टींवरच टीका करत बसले आहेत. आंदोलनाला अपेक्षित यश न मिळाल्याचं खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत शेट्टींनी खोत यांना प्रत्युत्तर दिलं. माझ्या नावे ३००-४०० एकर जमीन सापडली, तर तिची विक्री करूया. त्यातून आलेले पैस कडकनाथ कोंबडीत ज्यांचे पैसे बुडाले त्यांना देऊया, असा टोला शेट्टींनी लगावला.

राजू शेट्टी हे तर सरकारी आंदोलक, देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

VIDEO: मोठी दुर्घटना; आंध्र प्रदेशातील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळून ११ मजुरांचा मृत्यू

Web Title: former minister sadabhau khot attacks raju shetty calls him bull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.