माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 02:58 PM2023-07-24T14:58:37+5:302023-07-24T15:09:18+5:30
Harshvardhan Jadhav: बीआरएस पक्षाचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
बीआरएस पक्षाचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. दिल्लीत गेले असताना हर्षवर्धन जाधव यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेना, मनसे या पक्षांमध्ये काम केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी हल्लीच तेलंगाणातील के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, काही कामानिमित्त हर्षवर्धन जाधव हे दिल्लीला गेले होते. तिथे ते नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी गेले असताना, नितीन गडकरी यांच्या निवास्थानीच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासणी केल्यावर हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे समोर आले. हर्षवर्धज जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून प्रकृतीची माहिती दिली आहे. त्यात ते म्हणाले की, मला बहुतेक हृदयविकाराचा झटका आला आहे. नितीन गडकरी यांच्या घरी असताना मला हृदयविकाराचा झटका आला. आता मला रुग्णालयात घेऊन जात आहेत. माझी आधी अँजियोप्लास्टी झालेली आहे. भारत माता की जय, देशाची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या. कन्नड मतदारसंघाची काळजी घ्या. वाचलो तर पुन्हा भेटू, असं आवाहन त्यांनी या व्हिडीओतून केलं आहे.