माजी आमदार सानंदांना अखेर अटक!

By admin | Published: February 1, 2016 02:17 AM2016-02-01T02:17:21+5:302016-02-01T02:17:21+5:30

अपहार प्रकरण,वातावरण चिघळले, सर्मथकांवर लाठीहल्ला, विरोधकांची आतषबाजी.

Former MLA Sanand arrested! | माजी आमदार सानंदांना अखेर अटक!

माजी आमदार सानंदांना अखेर अटक!

Next

खामगाव (जि. बुलडाणा) : खामगाव नगरपरिषदेच्या इमारत बांधकामात झालेल्या कथित अपहार प्रकरणी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना त्यांच्या सानंदा निकेतन निवासस्थानाहून पोलिसांनी रविवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास अटक केली. त्यांच्या अटकेनंतर सर्मथकांनी पोलीस स्टेशनसमोर एकच गर्दी केली होती. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला. सानंदा यांच्या सर्मथकांकडून कारवाईचा विरोध, तर कारवाईचे स्वागत करण्यासाठी विरोधकांनी केलेली आतषबाजी यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
२00६ ते ११ या काळात खामगाव नगरपरिषदेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. यासाठी आर्किटेक्ट नियुक्त करण्यासह इमारत बांधकामातही भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नगरसेवक संदीप वर्मा यांनी पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यामुळे वर्मा यांनी न्यायालयाकडे धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार खामगाव शहर पोलिसांनी २९ ऑक्टोबर २0१४ रोजी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा, माजी नगराध्यक्षा सौ. सरस्वतीबाई खासणे, नगरसेवक अनिल नावंदर, दिनेश अग्रवाल, तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी शिंगनाथ, तसेच नाशिक येथील काबरा अँड कन्स्ट्रक्शन कंपनीविरूद्ध यांच्यासह संबंधितांवर भादंवि कलम ४0३, ५0६, ४0८, ४0९, ४१७, ४१८, ४६५, ४६६, ४६७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. इमारत बांधकामाच्या खर्चावर लेखा परिक्षणातही आक्षेप नोंदविण्यात आले होते. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सानंदा यांनी येथील जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे त्यांनी धाव घेतली होती. नागपूर खंडपीठाने त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता; परंतु २१ डिसेंबर २0१५ रोजी झालेल्या अंतिम सुनावणीदरम्यान खंडपीठाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत सानंदा यांना दोन दिवसात खामगाव शहर पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने अवैध सावकारी प्रकरणातही महत्वपूर्ण आदेश देत, सानंदांमुळे राज्य शासनाला भरावा लागलेला १0 लाखाचा दंड त्यांच्याकडून वसूल करावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर सानंदा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेला आदेश गोंधळ निर्माण करणारा होता. आपल्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचा दावा सानंदा यांनी केला होता. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने सानंदा यांना कोणताही दिलासा दिला नसून, ते आपल्या सोयीचा अर्थ काढत असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला होता. महत्वाचे म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे खामगाव सत्र न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीला स्थगनादेश दिला होता.
दरम्यान, पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत शासनाचे, तसेच सर्वोच्च न्यायालयातील वकीलांचे मत मागितले होते. त्यानुसार सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात बाजु मांडणारे वकील निशांत कटनेश्‍वरकर यांनी लेखी मत नोंदवून या प्रकरणाला स्थगनादेश नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे खामगाव न्यायालयाने त्यांच्या आदेशातील स्थगनादेश शब्द काढून टाकावा यासाठी शासनातर्फे खामगाव येथील सरकारी वकील अँड. उदय आपटे यांनी ३0 जानेवारी रोजी अर्ज दाखल केला होता. गत काही दिवसांपासून या मुद्यावर खामगावात प्रचंड राजकारण पेटले होते. ३१ जानेवारी रोजी खामगाव शहर पोलिसांनी याप्रकरणी दिलीपकुमार सानंदा यांच्यासह इतरांना कलम १६0 प्रमाणे चौकशीसाठी संध्याकाळी ५ वाजता शहर पोलिस स्टेशनला हजर होण्याच्या नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतर रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास याप्रकरणी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना त्यांच्या सानंदा निकेतन या बंगल्यावरुन ताब्यात घेण्यात आले. बराच वेळ पोलिसांनी यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. अखेर त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी रात्री उशिरा देऊन, त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.
याप्रसंगी दिलीपकुमार सानंदा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगुन त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्‍वास व्यक्त केला. चौकशीअंती सर्व सत्य बाहेर येईल; मात्र सद्यस्थितीत पोलिस यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करीत आहे. विरोधकांनी रस्त्यावर येवून जो उन्माद केला, त्याला पोलिसांनी अटकाव केला नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा. हे विरोधकांचे षडयंत्र असून लवकरच या प्रकरणातील सत्यता उघड होईल, असे ते म्हणाले.

*पोलिसांचा लाठीहल्ला
माजी आमदार सानंदा यांना ताब्यात घेवून पोलिस स्टेशनला आणल्यानंतर त्यांच्या सर्मथकांनी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी सर्मथकांसह उपस्थित इतरांवर लाठीहल्ला केला. पोलिस स्टेशन ते जगदंबा चौक, तसेच एकबोटे चौकापर्यंत रस्त्यावर गर्दी करणार्‍या नागरिकांवरही पोलिसांनी लाठीहल्ला केला. यामध्ये अनेकजण जखमी झाले. पत्रकारांनासुध्दा पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. जमावाला पांगविल्यानंतर शहर पोलिस स्टेशन परिसरात बॅरिकेड लाऊन प्रवेशबंदी करण्यात आली. यावेळी सानंदा यांच्या विरोधी गटाच्या जमावाने पोलिस स्टेशनसमोर नारेबाजी करून, आतषबाजीही केली. त्यामुळे वातावरण चिघळले होते. रात्री उशिरापर्यंत शहरात तणावपूर्ण शांतता होती. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी रुपाली दरेकर या शहर पोलिस स्टेशनला तळ ठोकून होत्या.

Web Title: Former MLA Sanand arrested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.