बाळासाहेबांचा आदेश अन् नोकरीचा राजीनामा देणाऱ्या माजी आमदारानं ठाकरेंची साथ सोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 03:54 PM2024-02-01T15:54:47+5:302024-02-01T15:56:52+5:30
१९९० ते २०१४ पर्यंत सूर्यकांत दळवी सतत आमदार राहिले. २०१४ मध्ये सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाला. त्यात पक्षातील मतभेदामुळे गद्दारी झाली असा आरोप सूर्यकांत दळवी करत होते.
मुंबई - आगामी निवडणुकींसाठी शिवसेना ठाकरे गटानं जोरदार कंबर कसली आहे. त्याचसाठी आज उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर आहेत. याठिकाणी जनसंवादच्या माध्यमातून उद्धव ठाकरे लोकांना संबोधित करत आहेत. मात्र याचवेळी ठाकरे गटाला भारतीय जनता पार्टीने मोठा धक्का दिला आहे. तब्बल २५ वर्ष शिवसेनेत आमदार असणाऱ्या सूर्यकांत दळवी यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
सूर्यकांत दळवी हे दापोलीचे माजी आमदार असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. २०१४ च्या निवडणुकीत पक्षातील अंतर्गत वादातून त्यांचा पराभव झाल्याचे ते बोलत होते. त्यानंतर २०१९ मध्ये रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली. तेव्हापासून सूर्यकांत दळवी नाराज होते. आज उद्धव ठाकरे हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भाजपाने कोकणातील सूर्यकांत दळवी यांना पक्षात प्रवेश देत ठाकरेंना धक्का दिला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर सूर्यकांत दळवींना उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी मिळेल अशी आशा होती. परंतु दापोली मतदारसंघाची जबाबदारी दळवींचे कट्टर विरोधक अनंत गीतेंकडे सोपवली त्यानंतर दळवींची नाराजी आणखी वाढली. गेल्या काही दिवसांपासून सूर्यकांत दळवी ठाकरे गटाच्या कार्यक्रमापासून लांब राहत होते. अखेर सूर्यकांत दळवींनी नाराजीतून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. परंतु दापोली मतदारसंघात या जागी रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे आमदार आहेत. त्यामुळे सूर्यकांत दळवींना या मतदारसंघात भाजपा ताकद देणार का हा प्रश्न आहे.
बाळासाहेबांच्या आदेशावरून नोकरी सोडली अन्...
सूर्यकांत दळवी हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. १९९० मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावरून मुंबईतील भारत पेट्रोलियम कंपनीतील नोकरी सोडून दळवी थेट रत्नागिरीतील दापोलीत दाखल झाले. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सूर्यकांत दळवी यांनी कोकणातील रत्नागिरी इथं शिवसेना रुजवण्याचं काम केले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी सूर्यकांत दळवींना संधी दिली आणि पहिल्याच प्रयत्नात दळवी आमदार झाले. १९९० ते २०१४ पर्यंत सूर्यकांत दळवी सतत आमदार राहिले. २०१४ मध्ये सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाला. त्यात पक्षातील मतभेदामुळे गद्दारी झाली असा आरोप सूर्यकांत दळवी करत होते.