राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 01:19 PM2022-05-05T13:19:53+5:302022-05-05T13:20:14+5:30
राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी केली नावाची घोषणा
मुंबई – राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा माजी आमदार विद्या चव्हाण यांच्याकडे या पदाची जबाबदारी दिली आहे. विद्या चव्हाण यांची निवड केल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. त्याचसोबत सध्या राज्यातील जिल्हा कमिट्या तशाच राहणार आहेत मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्ष पद पहिल्यांदाच देण्याचा निर्णय झाल्याचे फौजिया खान यांनी सांगितले.
फौजिया खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी आदींची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली.
प्रदेशाध्यक्ष पदावर निवड केल्यानंतर विद्या चव्हाण म्हणाल्या की, महागाईसारख्या प्रश्नाकडे सध्या दुर्लक्ष झालं आहे. महिला वर्ग त्रासला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने संधी दिली आहे आणि जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेन असे सांगतानाच माध्यमाकडून सहकार्य मिळावे अशी अपेक्षाही विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली.
रुपाली चाकणकर यांनी दिला होता राजीनामा
२३ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर(NCP Rupali Chakankar) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. सध्या रुपाली चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष पद आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडण्याचा निर्णय घेतला. चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला होता. चाकणकर या पुण्याच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. त्यानंतर त्यांना प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा म्हणून संधी मिळाली. राज्यात २०१९ च्या विधासभा निवडणुकीच्या वेळी महिला राष्ट्रवादीच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अचानक राजीनामा दिल्यानं त्या जागी रुपाली चाकणकर यांना संधी मिळाली होती.