मनसेचे माजी आमदार राजू पाटील 'सागर' बंगल्यावर; चर्चांना उधाण, भेटीचं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 12:59 IST2024-12-14T12:58:10+5:302024-12-14T12:59:32+5:30
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने वेगळे लढून चांगली मते घेतली आहेत, ते सरकारसोबत असावेत यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

मनसेचे माजी आमदार राजू पाटील 'सागर' बंगल्यावर; चर्चांना उधाण, भेटीचं कारण काय?
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. मंत्रिपदासाठी इच्छुक नेते नेतृत्वाकडे लॉबिंग करत आहेत. भाजपा आमदार देवेंद्र फडणवीस यांची भेट आहेत. त्यातच आज 'सागर' बंगल्यावर मनसेचे माजी आमदार राजू पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहचल्याचं समोर आले. राजू पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतली हे अद्याप समोर आलं नाही मात्र या भेटीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या.
सकाळपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेटीगाठीचं सत्र सुरू आहे. सोमवारपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरात होणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. रविवारी नागपूरात राजभवनात नव्या मंत्र्याचा शपथविधी पार पाडला जाईल अशी माहिती आहे. त्यातच मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मनसे आणि भाजपा यांच्यातील जवळीक कायम चर्चेचा विषय बनली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार न उतरवता भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र त्यानंतरची विधानसभा निवडणूक मनसेने स्वबळावर लढवली. मनसेला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. मनसेचे राजू पाटील यांना त्यांची जागा राखता आली नाही. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता मनसे भाजपा युतीची चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिथं शक्य होईल तिथं आम्ही मनसेला सोबत घेण्याचा विचार करू. आम्ही राज ठाकरेंना सरकारसोबत ठेवण्यासाठी सकारात्मक आहोत. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी उघडपणे आम्हाला पाठिंबा दिला होता त्याचा आम्हाला फायदाही झाला. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने वेगळे लढून चांगली मते घेतली आहेत. निश्चित त्यांच्या काही उमेदवारांना चांगली मते मिळाली. त्यांना सरकारसोबत ठेवण्याचा आमचा विचार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होते. राज ठाकरे यांच्या मनसेला सरकारमध्ये सहभागी करून घेणार का असा प्रश्न त्यांना मुलाखतीत विचारण्यात आला त्याला फडणवीसांनी हे उत्तर दिले होते.
दरम्यान, ५ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानला पार पडला. या शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना फोन करून निमंत्रित केले होते. परंतु वैयक्तिक कारणासाठी राज ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यानंतर राज यांनी ट्विटरवरून फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनतील असं भाकीत वर्तवले होते. मागील काही वर्षात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्री वाढली आहे. त्यामुळे या महायुती सरकारमध्ये मनसे असणार की नाही अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. शपथविधीच्या आधी राजू पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ही चर्चा पुन्हा सुरू झाली परंतु राजू पाटील यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आल्याचेही सांगण्यात येते.