माजी खासदार आनंदराव अडसूळ ईडी चौकशीवेळी अत्यवस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 06:03 AM2021-09-28T06:03:17+5:302021-09-28T06:04:30+5:30
सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून समन्स.
मुंबई : अमरावतीतील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ व त्यांचे पुत्र अभिजित यांना सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावून सोमवारी त्यांच्या मुंबईतील घरी चौकशी केली जात असताना अडसूळ यांची प्रकृती अचानक बिघडली.
अडसूळ यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, वैद्यकीय तपासणीच्या अहवालानंतर चौकशीबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. अडसूळ पिता-पुत्र माजी अध्यक्ष असलेल्या सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत ९८० कोटींचा कर्ज घोटाळा झाला आहे. याबाबत स्वतः अडसूळ यांनी बँकेच्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे राजकीय विरोधक नवनीत राणा यांनी ईडीकडे तक्रारी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने माजी खासदार आनंदराव अडसूळ व त्यांचे ुत्र अभिजित यांच्या चौकशीबद्दल समन्स घेऊन ईडीचे सहा अधिकारी सोमवारी सकाळी त्यांच्या कांदिवली पूर्व येथील निवासस्थानी पोहोचले.
त्यांनी पिता-पुत्राकडे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात येण्याची सूचना केली. अडसूळ यांनी त्यास नकार देऊन ते पुढील तारीख मागू लागले. यावेळी झालेला वादविवाद, तसेच तणावामुळे त्यांची प्रकृती बिघडली. छातीत दुखू लागल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. ११ वाजेच्या सुमारास आनंदराव अडसूळ यांना घरातून स्ट्रेचरवरून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून गोरेगाव येथील लाइफलाइन मेडिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारवाईसाठी आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांपैकी दोघे अधिकारीही रुग्णालयात आले. डॉक्टरांचा तपासणी अहवाल येईपर्यंत ते थांबून होते.
अडसूळ यांच्यावर नेमके आरोप काय?
सिटी बँकेमध्ये कामगार, पेन्शनधारक, ९९ टक्के मराठी लोकांची खाती होती. जवळपास नऊ हजार खातेधारक होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरीत्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळ यांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यात सुमारे ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप त्यांचे विरोधक व भाजपसमर्थक आमदार रवी राणा यांनी केला आहे.
खासदारकी रद्द होणार असल्याने कारवाई
भाजपला समर्थन दिलेल्या खा. नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्र बनावट दिल्याचे सिद्ध झाल्याने उच्च न्यायालयाने त्यांची खासदारकी अवैध ठरविली आहे. त्याबाबत २९ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे, त्या ठिकाणी आपल्या वडिलांना हजर राहता येऊ नये, यासाठी जाणीवपूर्वक तडकाफडकी ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी केला आहे.