सरकारने सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलं, याचं कौतुक; समाजासाठी मी उपस्थित राहणार- छत्रपती संभाजीराजे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 02:30 PM2023-09-11T14:30:13+5:302023-09-11T14:30:35+5:30

आजच्या सर्वपक्षीय बैठकीवर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Former MP Chhatrapati Sambhaji Raje has reacted to today's all-party meeting. | सरकारने सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलं, याचं कौतुक; समाजासाठी मी उपस्थित राहणार- छत्रपती संभाजीराजे 

सरकारने सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलं, याचं कौतुक; समाजासाठी मी उपस्थित राहणार- छत्रपती संभाजीराजे 

googlenewsNext

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यासाठी शासनाला दिलेल्या चार दिवसांच्या मुदतीत अपेक्षित निर्णय झालेला नाही. त्यामुळे आजपासून (रविवार) पाणी, उपचार बंद केल्याचे अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी सांगितले. २८ ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. १ सप्टेंबर रोजी येथील उपोषणकर्त्यांवर लाठीहल्ला झाल्यानंतर प्रकरण चिघळले आहे. आजवर शासनस्तरावरून उपोषणकर्त्यांशी शिष्टमंडळामार्फत चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. 

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथिगृहात होणाऱ्या या बैठकीला सत्ताधारी शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बोलावले आहे. सर्वपक्षीयांच्या बैठकीपूर्वी रात्रभर गोरगरिबांच्या मुलांचे आयुष्य डोळ्यासमोर आणावे. सर्वपक्षीयांनी योग्य मार्ग काढावा, अशी साद उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी घातली आहे.

आजच्या सर्वपक्षीय बैठकीवर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज सर्वपक्षीय बैठक आहे, कालच मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांचा फोन आला होता. समाजासाठी मी उपस्थित राहणार आहे. सरकारने सर्व पक्षीय नेत्यांना बोलवलं, याचं कौतुक असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. तसेच भावना आणि न्यायिक भूमिका यांचा समन्वय साधला जाईल, अशी अपेक्षा आहे, असं संभाजीराजे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाज आहे. इतके दिवस गरीब मराठा समाजाला बाहेर का ठेवले? राणे समितीने आरक्षण दिलं, ते टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देखील आरक्षण टिकलं नाही. या सरकारने दीड वर्षात भूमिका घेतली नाही, हे दुर्दैवी आहे. मी मागच्या सरकारला आणि या सरकारला देखील जाब विचारणार आहे, असं संभाजीराजेंनी यावेळी सांगितले.

शासनासमवेत चर्चेच्या तीने फेऱ्या अयशस्वी झाल्या असून, रविवारी सकाळपासून जरांगे यांनी पाणी पिणे, उपचार घेणे बंद केले आहे. रविवारी दुपारी व रात्री त्यांनी तपासणी करु दिली नाही. त्यामुळे त्यांची शुगर, बिपी तपासता आले नाहीत. डॉक्टरांनी रविवारीही दोन वेळेस विनवणी केली. मात्र जरांगे यांनी तपासणी व उपचार घेण्यास नकार दिला. वैद्यकीय पथक सोमवारी सकाळी वैद्यकीय पथक १०:४० वाजता उपोषणस्थळी आले होते. पथकातील डॉ. अतुल तांदळे यांनी बीपी, शुगर सह इतर तपासण्या करू द्या, अशी जवळपास अर्धा तास विनवनी केली. परंतु, जरांगे यांनी तपासणी, उपचारालाही नकार दिला.

टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका- CM शिंदे

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. शासन कुणालाही फसवणार नाही. टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे. घाईगडबडीत कोणाताही निर्णय घेणार नाही, असं स्पष्टीकरणही एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिलं. आज त्यामुळेच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे, असं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले. 

Web Title: Former MP Chhatrapati Sambhaji Raje has reacted to today's all-party meeting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.