माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे निधन
By admin | Published: July 17, 2015 01:06 AM2015-07-17T01:06:02+5:302015-07-17T01:06:02+5:30
लोकसभेवर निवडून गेलेले शिवसेनेचे पहिले खासदार व प्रख्यात उद्योगपती मोरेश्वर दीनानाथ सावे यांचे गुरुवारी दुपारी येथे एका खासगी इस्पितळात निधन झाले.
औरंगाबाद : लोकसभेवर निवडून गेलेले शिवसेनेचे पहिले खासदार व प्रख्यात उद्योगपती मोरेश्वर दीनानाथ सावे यांचे गुरुवारी दुपारी येथे एका खासगी इस्पितळात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. अण्णासाहेब या नावाने परिचित असलेल्या सावे यांच्या पश्चात पत्नी लीलावती, अनिल, अजित व आमदार अतुल सावे ही तीन मुले, विवाहित कन्या अंजली व नातवंडे असा परिवार आहे.
घरी बाथरूममध्ये पडल्याने त्यांना गेल्या २५ दिवसांपूर्वी कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी त्यांच्यावर पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मोरेश्वर सावे यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३१ रोजी मुंबई येथे झाला. उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथून ते बी. कॉम. उत्तीर्ण झाले होते. १९८८मध्ये औरंगाबाद मनपाच्या पहिल्याच निवडणुकीत नगरसेवक झाल्यापासून सावे यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यावेळी अपक्ष असलेले सावे पुढे शिवसेनेच्या पाठिंब्यावर १९८९-९० या काळात महापौर बनले. सावे यांनी १९८९ ते ९१ व १९९१ ते ९६ असे लागोपाठ दोन वेळा लोकसभेत औरंगाबादचे प्रतिनिधित्व केले. सावे यांनी औरंगाबादच्या उद्योग क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. १९८७-८९ या काळात ते चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष होते. तर त्याआधी १९८५ ते ८७ या काळात उपाध्यक्ष राहिले होते. हैदराबाद मुक्तिसंग्रामात सक्रिय सहभाग घेतलेल्या मोरेश्वर सावे यांचे औरंगाबादच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनातही मोलाचे योगदान राहिले.