माजी नगराध्यक्षांच्या घरावर दरोडा!
By admin | Published: September 29, 2016 01:49 AM2016-09-29T01:49:30+5:302016-09-29T01:49:30+5:30
सिंदखेड राजा तालुक्यातील घटनेत सहा लाखांचा ऐवज चोरट्यानी लंपास.
सिंदखेड राजा(जि. बुलडाणा), दि. २८- माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक, भीमगर्जना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबन म्हस्के यांच्या घरावर आठ ते दहा जणांच्या सशस्त्रधारी दरोडेखोरांनी २८ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास हल्ला करून सहा लाखांचे सोने लुटून नेले. हल्लेखोरांनी बबन म्हस्के व त्यांच्या मुलालाही मारहाण करून जखमी केले. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळावर दाखल होऊन पाहणी केली. स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूला बबन म्हस्के यांचे निवासस्थान आहे. मंगळवारच्या रात्री घरात सर्वजण झोपले असताना बुधवारच्या सकाळी ३ वाजताच्या सुमारास ८ ते १0 दरडेखोरांनी हातात शस्त्र घेऊन आणि तोंडावर काळे कपडे बांधून, घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी बबन म्हस्के यांना जाग आली. त्यांनी घरातील महिलांना दुसर्या खोलीत सुरक्षित ठिकाणी पाठविले. तोपयर्ंत दरोडेखोरांनी आपल्या हातातील गुप्तीने म्हस्के यांच्यावर वार केला. मात्र, त्यांनी गुप्ती हातात पकडून, हल्लेखारोला अडविण्याचा प्रयत्न केला. तोपयर्ंत दुसर्या दरोडेखोराने बबन म्हस्के यांच्या डोक्यावर लोखंडी पाइपने वार केला. त्यामुळे ते रक्त बंबाळ झाले. त्याचवेळी त्यांची मुलगी पूजा हिने दरोडेखोराचा प्रतिकार करत त्यांच्या तोंडावरील रूमाल काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोरांनी तिच्या हातावर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केला. दरोडेखोरांनी बबन म्हस्के यांच्या गळ्यातील एक १0 तोळय़ाची व दुसरी ८ तोळय़ाची चैन, असा सहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. दरोडेखोरांचा पाठलाग करीत बबन म्हस्के महामार्गापयर्ंत आले. त्यांनतर बबन म्हस्के यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर साखरखेर्डा, किनगाव राजा, बीबी, देऊळगाव राजा येथील पोलिसांनी नाकाबंदी केली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्वेता खेडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने, समीर शेख आदींनी घटनास्थळी येऊन तपासणी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी आपल्या चमूसह तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी बबन म्हस्के यांची भेट घेऊन सांत्वन केले आणि तत्काळ दरोडेखोरांना अटक करण्याची मागणी केली.