माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 12:05 AM2018-07-03T00:05:48+5:302018-07-03T00:06:23+5:30
माजी नौदलप्रमुख अॅडमिरल (निवृत्त) जयंत गणपत नाडकर्णी (वय ८६) यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. मुंबई येथील नौदलाच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई : माजी नौदलप्रमुख अॅडमिरल (निवृत्त) जयंत गणपत नाडकर्णी (वय ८६) यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. मुंबई येथील नौदलाच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या दीड महिन्यांपासून नाडकर्णी आजारी होते. उपचारासाठी त्यांना मुंबई येथील नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयोमानापरत्वे त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. नाडकर्णी यांच्या पार्थिवावर मंगळवारी (३ जुलै) पुण्यातील मुक्तिधाम स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नौदलामध्ये रिअर अॅडमिरल असलेले रवी नाडकर्णी आणि अमेरिकेमध्ये असलेले विजय नाडकर्णी असे दोन पुत्र त्यांच्यामागे आहेत.
नाडकर्णी हे देशाचे चौदावे नौदलप्रमुख होते. डिसेंबर १९८७ ते नोव्हेंबर १९९० पर्यंत त्यांनी नौदलप्रमुख म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळली. निवृत्तीनंतर ते पुण्यात वास्तव्याला होते. मेरिटाइम हिस्ट्री सोसायटीचे ते संस्थापक सदस्य होते. ‘सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ या संस्थेचे काही काळ त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. नाडकर्णी यांच्या पत्नी विमल नाडकर्णी यांचे २०१६ मध्ये निधन झाले.