उमेदवारीसाठी आजी-माजी पदाधिकारी भिडले
By admin | Published: January 18, 2017 02:50 AM2017-01-18T02:50:38+5:302017-01-18T02:50:38+5:30
पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत आपआपसात भिडल्याचे चित्र एस वॉर्डमध्ये पाहावयास मिळाले आहे.
मनीषा म्हात्रे,
मुंबई- एरवी खांद्याला खांदा लावून फिरणारे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत आपआपसात भिडल्याचे चित्र एस वॉर्डमध्ये पाहावयास मिळाले आहे. यापैकी भांडुपच्या ११८ प्रभागामध्ये भाजपाचे चक्क ३५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत, तर ११३ मध्ये सेनेच्या ११ महिला पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
एस वॉर्डमध्ये १४ प्रभागांपैकी ११ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत, तर मोजून तीन प्रभाग खुले झाले असल्याने सर्वांनीच या प्रभागात नशीब अजमावण्यासाठी उडी घेतली आहे. वर्षानुवर्षे पक्षाची सेवा केल्याने आपल्यालाही संधी मिळायला हवी या उद्देशाने प्रत्येक जण पुढे येत आहे. त्यामुळे पक्षांतर्गतच आजी-माजी पदाधिकारी भिडल्याने वरिष्ठांची डोकेदुखी वाढली आहे. भांडुपचा ११८ प्रभाग हा खुला असल्याने भाजपाचे ३५ इच्छुक उमेदवार रिंगणात आहेत, तर ११५ मध्ये भाजपाचे १४ उमेदवार फिल्डिंग लावून आहेत. यामध्ये जिल्हा महामंत्री, माजी अध्यक्ष, महामंत्री, माजी तालुका अध्यक्ष, माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि आजी-माजी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
विक्रोळीचा ११३ हा प्रभाग महिलांसाठी खुला असल्याने सेनेच्या तब्बल ११ जणींमध्ये रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येकाकडून वरिष्ठांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर उमेदवारी दिली नाही तर पक्षत्याग करण्याचा पवित्रा काहींनी
घेतला आहे. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांच्या बाजूने जायचे की नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची या पेचात वरिष्ठ पडले आहेत.