माजी शिवसैनिक छगन भुजबळही आता सत्तेत !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 01:06 PM2019-11-15T13:06:44+5:302019-11-15T13:07:21+5:30
भाजपमध्ये गेलेल्या नारायण राणे यांच्यावर विरोधात बसण्याची वेळ आली आहे. तर राष्ट्रवादीसोबत कायम राहिलेले छगन भुजबळ आता सत्तेच्या खुर्चीत बसणार आहेत.
मुंबई - राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीमुळे अनेक नेत्यांची कोंडी झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच सत्तेची हवा पाहून अनेक नेत्यांनी विरोधी पक्षातून सत्ताधारी भाजपची वाट धरली होती. परंतु, आता भाजपवर विरोधात बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सत्तेची स्वप्न रंगवणारे नेते अडचणीत आले आहे. तर ज्यांना अपेक्षा नव्हती, अशा नेत्यांना सत्तेत बसण्याची संधी मिळणार आहे. अशीच काहीशी अवस्था दोन दिग्गज माजी शिवसैनिकांची झाली आहे. यापैकी एकाला सत्ता तर दुसऱ्यावर विरोधीपक्षात बसण्याची वेळी आली आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि छगन भुजबळ हे एकेकाळी कट्टर शिवसैनिक म्हणून परिचीत होते. परंतु, त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. राणे यांनी काँग्रेस गाठले तर भुजबळ गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत आहेत. परंतु, राज्यातील बदलेली स्थिती पाहता, राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर भुजबळ आहे तिथेचं आहे. ते देखील सेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, तस काही झालं नाही.
दरम्यान शिवसेनेने घेतलेल्या भाजपविरोधी भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना अशी शिवमहाआघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. त्यानुसार आपल्या मुलांसह भाजपमध्ये गेलेल्या नारायण राणे यांच्यावर विरोधात बसण्याची वेळ आली आहे. तर राष्ट्रवादीसोबत कायम राहिलेले छगन भुजबळ आता सत्तेच्या खुर्चीत बसणार आहेत.