टाटा फायनान्सचे माजी अधिकारी दिलीप पेंडसे यांची आत्महत्या
By admin | Published: July 6, 2017 04:40 AM2017-07-06T04:40:52+5:302017-07-06T04:40:52+5:30
टाटा फायनान्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक दिलीप सुधाकर पेंडसे (६१) यांनी बुधवारी दादर येथील त्यांच्या खाजगी कार्यालयात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टाटा फायनान्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक दिलीप सुधाकर पेंडसे (६१) यांनी बुधवारी दादर येथील त्यांच्या खाजगी कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वैयक्तिक कारणातून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. माटुंगा पोलिसांनी घटनास्थळावरून ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.
दादर (पूर्व) येथील रॉयल ग्रेस इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पेंडसे पत्नीसोबत राहायचे. इमारतीच्या तळमजल्यावर त्यांचे कार्यालय आहे. त्यांची तीन मुले परदेशात असतात. बुधवारी सकाळी ९ वाजता नेहमीप्रमाणे ते कार्यालयात आले. बराच वेळ झाला तरी पेंडसे घरी न आल्याने पत्नीने त्यांना फोन केला. मात्र मोबाइल आणि कार्यालयातील फोनवर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून पत्नीने तळमजल्यावरील ओळखीच्या व्यक्तीला कार्यालयात पाहण्यास सांगितले. दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी खिडकीतून डोकावले असता, पेंडसे हे दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षास दिली. घटनेची वर्दी मिळताच माटुंगा पोलीस तेथे दाखल झाले. पेंडसेंना सायन रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनास्थळी पोलिसांनी सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये माझ्यावर असलेल्या केसेसना कंटाळून आत्महत्या करत आहे. यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये’ असे पेंडसे यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी.एम. काकड यांनी दिली.
मला माफ करा... ‘माझ्या विरुद्ध अनेक खटले आहेत. या सगळ््याला मी कंटाळलो आहे. माझ्या आत्महत्येबाबत कुणालाही जबाबदार धरु नका.. मला माफ करा’, अशा आशयाची पाच ओळींची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे.
आर्थिक व्यवहारांबाबत झाली होती कारवाई
२००१ मध्ये पेंडसे हे टाटा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक असताना टाटा फायनान्स तोट्यात गेल्याने टाटा समूहाने त्यांच्यावर कारवाई केली होती. पेंडसेंविरुद्ध आॅक्टोबर २००२ मध्ये टाटा फायनान्सतर्फे तक्रार करण्यात आली होती. चार कंपन्याच्या समभाग व्यवहारांमध्ये नियमांची पायमल्ली केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यांना तुरुंगवासही झाला होता.
तपासानंतर सेबीने पेंडसेंना एप्रिल २००९ मध्ये नोटिस पाठविली व डिसेंबर २०१२ मध्ये आदेश जारी केला. या प्रकरणात पेंडसे यांना २४ डिसेंबर २०१२ मध्ये दोन वर्षांपर्यंत भांडवली बाजारात व्यवहार करण्यास सेबीने बंदी घातली होती. त्याविरुद्ध पेंडसे लवादात गेले होते. लवादाच्या निर्देशानंतर सेबीने पेंडसे यांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिली होती.लवादाने सेबीला तपास करून १६ एप्रिल २०१४ रोजी नव्याने आदेश देण्यास सांगितले.