माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 04:51 PM2024-09-30T16:51:51+5:302024-09-30T16:52:06+5:30

Sanjana Jadhav : या अपघातात संजना जाधव, त्यांचे चालक आणि गाडीत असलेले कार्यकर्ते थोडक्यात बचावले.

Former Union Minister Raosaheb Danve's daughter Sanjana Jadhav's car accident | माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या

छत्रपती संभाजीनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात झाला. सोमवारी (दि.३०) धुळे-सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव येथे हा अपघात झाला. या अपघातातून संजना जाधव थोडक्यात बचावल्या आहेत. तर त्यांच्या गाडीचे नुकसान झालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव या सोमवारी सकाळी आपले सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जयेश बोरसे, शेरोडी ग्रामपंचायतचे सरपंच ज्ञानेश्र्वर निकम, आदित्य गर्जे यांच्यासह गाडीतून कन्नड येथून नागद पट्ट्यातील बनोटी गावाकडे, गावभेट दौऱ्यानिमीत्त जात होत्या. यादरम्यान रांजणगाव फाट्याजवळ समोरुन येणारी पिकअपने चुकीच्या बाजूने भरधाव वेगाने येत संजना जाधव यांच्या गाडीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

या अपघाताच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघात घडल्यानंतर लगेच स्थानिकांनी बचावासाठी धाव घेतली. या अपघातात संजना जाधव आणि त्यांच्यासोबत गाडीत असलेले कार्यकर्ते थोडक्यात बचावले. तसेच, संजना जाधव यांच्या गाडीला धडक देणारा पिकअप चालक सुद्धा सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात संजना जाधव यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता, गाडीतील आम्ही सर्व जण सुखरूप आहोत, सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात सध्या प्रत्येक पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. संजना जाधव या देखील राजकारणात सक्रीय आहेत. कन्नड विधानसभा मतदारसंघातून संजना जाधव या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मतदारसंघातील जनतेच्या गाठीभेटी घेऊन, त्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्या देत आहेत.

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे संजना जाधव यांचे पती होते. पण, कौटुंबिक कलहानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतर आता कन्नड विधानसभा निवडणुकीत दोन्ही पती-पत्नी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची चर्चा होत आहे. अर्थात याबाबत काय-काय घडामोडी घडतात? ते आगामी काळात स्पष्ट होईल.
 

Web Title: Former Union Minister Raosaheb Danve's daughter Sanjana Jadhav's car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.