कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू बळवंत बथकल यांचे निधन
By admin | Published: June 16, 2017 02:19 AM2017-06-16T02:19:14+5:302017-06-16T02:19:14+5:30
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे १२ वे कुलगुरू डॉ. बळवंतराव गोविंदराव बथकल यांचे गुरुवार, १५ जून रोजी सकाळी नागपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे १२ वे कुलगुरू डॉ. बळवंतराव गोविंदराव बथकल यांचे गुरुवार, १५ जून रोजी सकाळी नागपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर यवतमाळ जिल्ह्यातील वणी या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते एक उत्कृष्ट प्राध्यापक , संशोधक, विस्तारकर्ते, वास्तवातील शेती अभ्यासक, कृषी शास्त्रज्ञ मार्गदर्शक होते. आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवा काळात डॉ. बथकल यांनी विविध महत्त्वाची पदे भूषवित त्यांना यथोचित न्याय देण्याचे काम केले. डॉ.बथकल लोकमत अकोला आवृत्तीमध्ये सल्लागार समितीचे सदस्य होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सरळ सेवेने सहायक प्राध्यापक म्हणून आपली कारकीर्द सुरू करणारे डॉ. बथकल यांनी देशातील मोजक्याच कृषी विद्यापीठांमध्ये सुरू झालेल्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प केंद्राचे पहिले प्रमुख शास्त्रज्ञ होणाचा बहुमान प्राप्त केला. याखेरीज विभाग प्रमुख, प्रक्षेत्र संचालक, संचालक संशोधन आणि कुलगुरू आदी महत्त्वाच्या पदांवर काम केले. जागतिक बँकेच्या सहायाने संपूर्ण देशभरात एकूण १० पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प मंजूर झाले होते, पैकी विदर्भातील एकमेव मनोली पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प डॉ. बथकल यांच्या कारकिर्दीत विकसित झाला, तसेच कृषी पद्धती व पर्यावरण केंद्राची स्थापनासुद्धा त्यांच्या कार्यकाळात झाली. त्यांच्या कार्यकाळात व मार्गदर्शनात डॉ. तय्यब या जगविख्यात कापूस संशोधकाने नर नपुंसकतेवर आधारित प्रथम संकरीत कापूस वाण निर्मित केले. या उपलब्धींनी या विद्यापीठाला केवळ देश पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर ओळख निर्माण करून दिली. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पदावर (१५ मे १९९३ ते ३० एप्रिल १९९६) काम करताना डॉ. बथकल यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सेवानिवृत्तीनंतरसुद्धा आपले शेतीविषयक कार्य विदर्भ कृषी विकास मंच या संस्थेच्या माध्यमातून निरंतर सुरू ठेवले.
शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेतीविषयक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठीचे त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. सेवानिवृत्तीनंतरसुद्धा डॉ. बथकल विद्यापीठाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत सर्वांना प्रोत्साहित करीत असत. विशेषत: शिवार फेरी, संशोधन बैठका यामधील त्यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरत होते. विदर्भातील कृषी विकासात तसेच शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्यांच्या निराकरणातील त्यांचे योगदान चिरकाल स्मरणात राहील. डॉ. बथकल यांच्या अकाली निधनाने त्यांचा परिवार, मित्र, स्नेही, आप्त आणि शेतकरी वर्गावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने कृषी विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, कुलाचिव डॉ. प्रकाश कडू, अधिष्ठाता कृषी डॉ. व्ही.एम. भाले, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. महेंद्र नागदेवेसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शास्त्रज्ञांची उपस्थिती होती.