पूर्वी राष्ट्रवादीत तर आता भाजपामध्ये गुंडाराज
By admin | Published: March 7, 2017 09:53 PM2017-03-07T21:53:28+5:302017-03-07T21:53:28+5:30
सध्या महाराष्ट्रात खालच्या स्तराचे राजकारण सुरु आहे. कोण जिंकणार हे गृहित धरून काँग्रेस, मनसे किंवा राष्ट्रवादीमधील लोकांना भाजपामध्ये पक्षप्रवेश दिला जात आहे.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 7 : सध्या महाराष्ट्रात खालच्या स्तराचे राजकारण सुरु आहे. कोण जिंकणार हे गृहित धरून काँग्रेस, मनसे किंवा राष्ट्रवादीमधील लोकांना भाजपामध्ये पक्षप्रवेश दिला जात आहे. पूर्वी राष्ट्रवादीमध्ये गुंडाराज होते ते आता भाजपामध्ये सुरु असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या राज्य संयोजिका प्रिती मेनन यांनी जळगावात केला आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध मुक्ताईनगर कोर्टात खटला दाखल आहे. या खटल्याच्या कामकाजासाठी त्या मंगळवारी आल्या होत्या.
भ्रष्टाचार केवळ मुंबई महापालिकेतच आहे का?
शिवसेना व भाजपा हे सत्तेत राहण्यासाठी काही करतात. शिवसेना म्हणते भाजपा भ्रष्टाचारी तर भाजपा म्हणते शिवसेना भ्रष्टाचारी आहे. दोन्ही पक्ष भ्रष्टाचारी आहेत तर शिवसेना व भाजपाची राज्यात व केंद्रात युती कशासाठी आहे. केवळ मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे का? राज्यात पारदर्शी कामकाज सुरु आहे का? असा सवाल त्यांनी केला.
जिंकण्याची क्षमता असलेल्यांना पक्षप्रवेश
महाराष्ट्रात सध्या खालच्या स्तराचे राजकारण सुरु आहे. निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर करण्यात आले. पिंपरी चिंचवड असो किंवा नाशिक महापालिका या ठिकाणी भाजपाचे नगरसेवक मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसमधून आलेले आहेत. कोणत्या उमेदवाराची जिंकण्याची क्षमता आहे ते पाहूनच त्यांना पक्ष प्रवेश दिल्याचा आरोप त्यांनी केला.
आधी राष्ट्रवादीचे आता भाजपाचे गुंडाराज
निवडणुका जिंकण्यासाठी मग पप्पू कलाणी असो किंवा त्यांचे नातलग यासाऱ्यांना पक्ष प्रवेश मिळाला. आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत अरुण गवळी यांच्या कन्येचा फोटा व्हायरल झाला आहे. सर्व गँगस्टर तसेच गुन्हेगारी घटक भाजपामध्ये जमा होत आहेत. पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते ते आज भाजपामध्ये गुंडाराज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही चिंतेची बाब आहे.
खडसे यांच्या कन्येविरूद्ध गुन्हा दाखल व्हावा
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतील एका शाखेत ७३ लाखांच्या जुन्या नोटाबदली केल्याप्रकरणी सीबीआयने बँकेच्या कार्यकारी संचालकांसह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. हे चमत्कारिक आहे. सीबीआयने या कारवाईत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या व जिल्हा बँकेच्या चेअरमन यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तसेच अन्य शाखांमध्ये काय झाले याची चौकशी कोण करणार ? असा प्रश्न उपस्थित केला.
भाजपाचे यश पैसा व बळाच्या आधारे
महाराष्ट्रातील बँकांमध्ये पैसे बदलण्यात आले का? याची देखील चौकशी करावी. जि.प.व नगरपालिका निवडणूक भाजपानेपैसावबळाच्याआधारेजिंकल्याचाआरोपत्यांनीकेला.