किल्ले अंजनेरी

By admin | Published: April 30, 2017 02:40 AM2017-04-30T02:40:38+5:302017-04-30T02:40:38+5:30

किल्ला चढाईस २ तास लागतात. अंजनेरी गावातून जाताना उजव्या बाजूस आपणास तीन सुळके दिसतात. त्यातील मोठ्या सुळक्याला नवरदेव तर छोट्या दोन सुळक्यांना

Forts of Anjar | किल्ले अंजनेरी

किल्ले अंजनेरी

Next

- गौरव भांदिर्गे


अंजनीसुत हनुमानाचे जन्मस्थान असलेला किल्ले अंजनेरी

गडदर्शन :- किल्ला चढाईस २ तास लागतात. अंजनेरी गावातून जाताना उजव्या बाजूस आपणास तीन सुळके दिसतात. त्यातील मोठ्या सुळक्याला नवरदेव तर छोट्या दोन सुळक्यांना सासू आणि नवरी म्हणतात. गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जाते. या वाटेने गावाला लागून असलेला डोंगर उजव्या हाताने वर चढून गेल्यावर आपण जीपगाडीच्या मार्गावर येतो. पुढे कच्च्या रस्त्याने साधारण अर्ध्या तासानंतर आपण आम्रवृक्षांशेजारी पोहोचतो. तेथून उजव्या हाताने पायऱ्यांच्या मार्गाने डोंगर चढाई करायची. साधारण १००-१२५ पायऱ्या, मध्येच सपाटी, पुन्हा पायऱ्या असे टप्पे पार केल्यावर आपण दोन कातळकड्यांमधील खिंडीच्या पायथ्याशी पोहोचतो. येथून संपूर्ण मार्ग पायऱ्यांचा आहे.
या पायऱ्यांनी जात असताना डाव्या बाजूस कातळात खोदलेली एक जैन गुंफा आहे. तिथून खिंडीतल्या पायऱ्यांनी किल्ल्याच्या सपाटीवर पोहोचायचे. सपाटीवर कोरडे टाके व भग्न तटबंदीचे अवशेष दिसतात, तसेच वर चढून गेल्यावर आपण हनुमान तळ्यावर पोहोचतो. येथून डाव्या बाजूने कातळात खोदलेल्या सीतागुंफेत पोहोचतो. येथे काही शिल्पे, चौकटी प्रवेशद्वार, दगडी घडीव पायऱ्या, द्वारपालांच्या मूर्ती पाहायला मिळतात. येथून गर्द झाडीतून बालेकिल्ल्यावर पोहोचायचे. ही वाट म्हणजे खडी चढाई आहे. शासनाने रेलिंग लावलेल्या आहेत. याच्या आधारे वर चढाई करावी व मधल्या टप्प्यावर डाव्या बाजूला जावे. आपणास एक कातळकोरीव गुंफा लागते. येथेच हनुमानाचा जन्म झाला, असे सांगितले जाते. पुन्हा रेलिंगकडे जावे. साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण सर्वोच्च माथ्यावर येऊन पोहोचतो. येथून १५ मि. चालून गेल्यावर आपण अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. या मंदिरात अंजनीमातेची मूर्ती व तिच्या मांडीवर बसलेला हनुमान अशी मूर्ती आहे. मंदिरामागेच इतिहासकालीन इमारतींचे चौथरे आहेत. परतीसाठी आल्यावाटेने परत जावे. जाताना अंजनेरी गावात १२व्या शतकातील हिंदू व जैन मंदिरे आवर्जून पाहावीत व तेथून ४ कि.मी. अंतरावर असलेले जगातील सर्वांत मोठे नाणिसंग्रहालय पाहावे.

किल्ल्यावर जाण्याच्या वाटा
नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणारी बस पकडायची व २० कि.मी. अंतरावर असलेल्या अंजनेरी फाट्यावर उतरायचे. येथून डाव्या बाजूच्या कच्च्या रस्त्याने चालू लागायचे. येथून अंजनेरी गावात पोहोचायला साधारण अर्धा तास लागतो.

इतिहास
अंजनेरी किल्ल्याचा उल्लेख अगदी राष्ट्रकुट काळापासून मिळतो. हा परिसर चालुक्यांच्या अंमलाखाली होता. त्या वेळी अंजनेरी गाव त्र्यंबकेश्वरहून मोठे होते. दीड हजार वर्षांपूर्वी गवळी राजाची राजधानी होती. शिवकालात आॅक्टोबर १६७०मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी त्र्यंबकगड जिंकून घेतला, त्याच वेळी अंजनेरीसुद्धा स्वराज्यात आला. पुढे १७५०मध्ये निजामाच्या ताब्यात गेला. पुढे पेशवे काळात राघोबादादा पेशवे यांनी किल्ल्यावर विश्रांतीसाठी एक वाडा बांधला होता. नंतर इंग्रजांनी हनुमान तळ्याच्या काठावर थंड हवेचे ठिकाण म्हणून एक बंगला बांधला होता. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.

Web Title: Forts of Anjar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.