किल्ले अर्नाळा

By admin | Published: May 14, 2017 04:41 AM2017-05-14T04:41:02+5:302017-05-14T04:41:02+5:30

अर्नाळा किल्ला विरारजवळ आहे. येथे रेल्वेने जायचे असल्यास विरार स्टेशन गाठावे व पश्चिमेस बाहेर पडावे

Forts Arnala | किल्ले अर्नाळा

किल्ले अर्नाळा

Next

- गौरव भांदिर्गे
अर्नाळा किल्ला विरारजवळ आहे. येथे रेल्वेने जायचे असल्यास विरार स्टेशन गाठावे व पश्चिमेस बाहेर पडावे. बाहेर पडल्यावर अर्नाळा गावात जाण्यासाठी भरपूर बस उपलब्ध आहेत. तेथून अर्नाळा गाव साधारण १५ कि.मी. वर आहे. गावातून किनाऱ्यावर जायला १० मि. लागतात. किनाऱ्यावरून समोरच संपूर्ण अर्नाळा बेट नजरेत भरते. अर्नाळा किल्ल्याच्या बेटावर जाण्यासाठी फेरीबोटीची सोय असून, सकाळी ६.३० ते दुपारी १२.३० व सायंकाळी ४ ते ७ या वेळेतच त्या सुरू असतात. फेरीबोटीत चढण्यासाठी गुडघाभर पाण्यातून जावे लागते. त्यामुळे शूज वगैरे घालणे टाळावे. पुढे बेटावर जाण्यासाठी साधारण १० मि. लागतात व उतरतानासुद्धा गुडघाभर पाण्यात उतरावे लागते. भरतीच्या वेळी किंवा पावसाळ्यात वादळी वाऱ्याच्या वेळेस किल्यावर जाणे टाळावे.
गडदर्शन
बोटीच्या प्रवासानंतर गुडघाभर पाण्यातून अर्नाळा बेटाच्या भूभागावर पोहोचावे. तेथून समुद्र उजव्या बाजूला ठेवत, कालिका मातेचे मंदिर गाठावे. भरतीच्या वेळी मंदिरात जाता येत नाही. दर्शन घेऊन मागच्या बाजूने बेटावरील कोळी वस्तीमधून १० मिनिटांत अर्नाळा किल्ल्याच्या समोर येतो. डोळ्याचे पारणे फेडणारे हे दृश्य बघून शनिवारवाड्याची आठवण येते. २३ मे १७३७ साली हा किल्ला पेशव्यांनी बांधून पूर्ण केला. गडाच्या बुरुजात बांधलेल्या दर्शनी महादरवाज्याच्या दोन्ही बाजूस द्विपंखधारी केवल शरभ व त्याच्या थोडेसे खाली सोंड उंचावून त्यात पुष्पमाला धरलेल्या हत्तीचे द्वारशिल्प आहेत.
दोन्ही द्वारशिल्प एकमेकांच्या दर्पणप्रतिमा आहेत. महाद्वाराच्या कमानीवरील फुलांची वेलबुट्टी व दोन्ही बाजूस कोरलेली कमळे बघण्यासारखी आहेत. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या व भव्य घुमट पाहायला मिळतो. येथून परत डाव्या बाजूस दुसरा दरवाजा लागतो, तो पार करून उजव्या बाजूस वळून थेट तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्यांनी तटबंदीवर जावे व गडफेरी करावी. संपूर्ण गडफेरीस २ ते ३ तास लागतात.
हा किल्ला आयताकृती असून, ३५ ते ४० फूट उंच तटबंदी आहे व चार कोपऱ्यात चार आणि उत्तरेकडील तटबंदीत महाद्वाराच्या दुतर्फा दोन, पश्चिमेकडील तटबंदीत दोन व दक्षिणेकडील तटबंदीत एक असे एकूण नऊ बुरूज आहेत. या बुरुजांना यशवंत बुरूज, भवानी बुरूज, गणेश बुरूज आणि सुटा बुरूज अशी नावे आहेत. तटफेरी मारताना तटबंदीत बांधलेले शौचकूप व प्रत्येक बुरुजात बांधलेली एक खोली दिसते. गणेश बुरूज हा या किल्ल्यातील महत्त्वाचा बुरूज आहे. गणेश बुरुजातून चिंचोळ्या वाटेने खाली उतरल्यावर, पहारेकऱ्यांच्या भव्य देवड्या पाहायला मिळतात व तेथे दरवाजा असून, त्याच्या दोन्ही बाजूस शरभाची शिल्पे कोरलेली आहेत व सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
तटफेरी पूर्ण करून मधील सपाटीच्या भूभागावर यावे, तेथे त्र्यंबकेश्वराचे मंदिर व दुसऱ्या बाजूस दर्गा आणि राजवाड्याचे अवशेष आहेत. मंदिराच्या बाहेरच अष्टकोनी विहीर असून, तेथे काठावर उत्खननात सापडलेली गणेशमूर्ती आहे व समोरच बुरुजामधील चौकोनी खोलीत नित्यानंद स्वामी काही काळासाठी वास्तव्यास होते, म्हणून त्यांच्या शिष्यांनी त्या खोलीचे रूपांतर मंदिरात केले आहे. शेजारीच भवानीमातेचे मंदिर व दक्षिणेकडील चोर दरवाजा व विहीर आहे. हा किल्ला घेण्यासाठी इग्रजांनी किल्ल्याच्या तटबंदीवर तोफगोळ्यांचा मारा केला होता. त्यातील एक तोफगोळा तटबंदीत अडकला होता. गडाच्या दक्षिण बाजूस १ कि.मी. अंतरावर ३६ फूट उंचीचा गोल टेहळणी बुरूज आहे व मोरटेल नावाच्या इंग्रजांच्या संकल्पनेतून हा बुरूज बांधला म्हणून याला ‘मोरटेलो टॉवर’ म्हणतात. गावात याला ‘हनुमंत बुरूज’ म्हणतात.
>इतिहास
चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग इ.स.
१५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच
हा किल्लादेखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.

Web Title: Forts Arnala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.