किल्ले हातगड
By admin | Published: January 22, 2017 01:29 AM2017-01-22T01:29:40+5:302017-01-22T01:29:40+5:30
गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर उभा असलेला. इतिहास काळात व्यापारी मार्गावर करडी नजर ठेवणारा असा भव्य शिलालेखाचा मानकरी किल्ले हातगड.
- गौरव भंदिर्गे
गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर उभा असलेला. इतिहास काळात व्यापारी मार्गावर करडी नजर ठेवणारा असा भव्य शिलालेखाचा मानकरी किल्ले हातगड.
जाण्याच्या वाटा
नाशिक वणीमार्गे सप्तशृंगीदेवीकडे न जाता सापुताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागायचे. तेथून बोरगाव गाठावे. बोरगावहून ४ कि.मी. गेल्यावर उजव्या हाताला हातगड लागतो. खासगी वाहने गडाच्या पायथ्याशी जातात.
देवनागरी लिपीतील ४७० वर्षांपूवीचा देवनागरी लिपीतील संस्कृत शिलालेख येथे आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील हा सगळ्यात मोठा शिलालेख आहे.
गडावर पाहण्याची ठिकाणे
गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने जाताना पायवाटेच्या उजव्या हातास गडाच्या कातळात खोदलेले पाण्याचे टाके लागते. ते पाहून आपण गडाच्या पहिल्या दरवाजात पोहोचतो. या दरवाजाची कमान पडलेली असून फक्त खांब शिल्लक आहेत. याच्या डाव्या खांबावर पायात हत्ती धरलेल्या शरभाचे शिल्प असून एक मराठी शिलालेखसुद्धा आहे आणि उजव्या बाजूस एक शिलालेखाचा दगड पडलेला आहे. तसेच पुढे गेल्यावर ४७० वर्षांपूवीचा एक भव्य, सोळा ओळींचा, देवनागरी लिपीतील संस्कृत शिलालेख पाहायला मिळतो. शिलालेख चार फूट उंच व दोन फूट चार इंच रुंदीचा आहे. त्यातील अक्षरे तीन इंच उंचीची असून, हा शिलालेख जमिनीपासून साडेसहा फुटांवर आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील देवनागरी लिपीतील हा सगळ्यात मोठा शिलालेख आहे. पण बऱ्याच जणांना हा शिलालेख माहीत नाही. गडमाथ्यावर जाण्यासाठी वाटेत आपल्याला कातळकोरीव पायऱ्या लागतात.
हातगडाच्या माथ्यावर डाव्या बाजूस भव्य तटबंदी आहे. आपण उत्तरेकडील उतारावर जायचे तेथे तटबंदीतील चर्या व अलीकडेच बांधलेले पिराचे थडगे, एक कोरडे टाके व गुप्त दरवाजा पाहावयास मिळतो. ही गडाची बाजू पाहून बालेकिल्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या पायऱ्यांकडे जायचे. मध्येच जमिनीवर असलेले शिवलिंग पाहायला मिळते. पुढे गेल्यावर एक उत्कृष्ट बांधणीची इमारत पाहायला मिळते. त्यातील सुरेख कोनाडे व देखणी गवाक्षे लक्ष वेधून घेतात. या इमारतीच्या आजूबाजूला अनेक वास्तूंचे चौथरे व कोरडी टाके दिसतात. याच तटाला लागून एक ध्वजस्तंभ आहे. तो पाहून धान्यकोठाराच्या वास्तूत पोहोचायचे. या वास्तूला एकापाठोपाठ एक कमानी असून पूर्व-पश्चिम भिंतीत झरोके आहेत. शेजारीच एक कोठी आहे. पुढे गेल्यावर एक भव्य तलाव आहे. तलावात खाली उतरण्यासाठी दोन पायऱ्या आहेत व मधोमध दगडी स्तंभ आहे. हा तलाव पाहून पुढे जाताना मधील उतारावर एक भव्य बुरूज पाहायला मिळतो. हा बुरूज आतून पोकळ असून वर जाण्यासाठी जिने आहेत. हा बुरूज पाहून उत्तर टोकाकडील तटबंदीच्या काठाकाठाने आपण गड प्रवेश केलेल्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचायचे.
इतिहास
एकूण सहा शिलालेख व सहा ताम्रपट हातगड किल्ल्याचा इतिहास उलगडतात. इतिहासकाळात हातगडाची बरीच नावे सापडतात. हस्तगिरी, होलगड, हातगा दुर्ग, हद्दगड, हतगुरू म्हणजे हद्दीवरचा गड. बागूल राजांचा कवी रुद्र राष्ट्रौढवंशम महाकाव्यम् या ग्रंथात बागूल राजांनी हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो. बागलाणात बागूल राजांची कारकीर्द १३०० ते १७०० अशी आहे. रुद्र कवीने १५९६ मध्ये राष्ट्रौढवंशम् हे महाकाव्य लिहिले. हातगडावरील शके १४६९ (सन १५४७) मध्ये कोरलेला शिलालेख बागूल राजाच्या ताब्यात हा किल्ला असल्याची साक्ष देतो. या शिलालेखात भैरवशहा या राजाच्या कामगिरीचा उल्लेख आहे. त्यापूर्वी हातगड निजामशाहीत होता. बागूल राजाकडून तो पुन्हा निजामशाहीत गेला. दिल्ली बादशहाच्या कागदपत्रात किल्ल्याचा उल्लेख होलगड असाही केल्याचे दिसते. याबाबतही इतिहासात असा उल्लेख मिळतो की, अबकर बादशहाच्या सांगण्यावरून सय्यद अब्दुल्ल याने मुलगा हसन अली याला किल्ला घेण्यासाठी पाठविले होते. त्या वेळी गंगाजी मोरे या किल्लेदाराने निकराचा लढा दिला. मात्र पराजय झाला. तेव्हा किल्ला मुगलांच्या ताब्यात गेला. हसन अलीने किल्ला जिंकला हे सांगण्यासाठी दिल्ली बादशहाला ९ आॅगस्ट १६८८ रोजी सोन्याचा किल्ला विजय प्रतीकचिन्ह सादर केले. या वेळी बादशहाने हसन अलीला ‘खान’ ही पदवी देत त्याचे सैन्य वाढविले. अनेक खाणाखुणांमधून हातगडचा इतिहास समोर येतो.