किल्ले हरिहर

By Admin | Published: March 19, 2017 12:56 AM2017-03-19T00:56:58+5:302017-03-19T00:56:58+5:30

त्रिकोणी कातळमाथ्याचा, किल्ला चढताना व उतरताना आपली त्रेधातिरपीट उडवणारा, स्वर्गरोहणाचा प्रवास इतका सोपा नसतो, या वाक्याची प्रचिती देणारा, इंग्रज अधिकारी

Forts Harihar | किल्ले हरिहर

किल्ले हरिहर

googlenewsNext

- गौरव भांदिर्गे

त्रिकोणी कातळमाथ्याचा, किल्ला चढताना व उतरताना आपली त्रेधातिरपीट उडवणारा, स्वर्गरोहणाचा प्रवास इतका सोपा नसतो, या वाक्याची प्रचिती देणारा, इंग्रज अधिकारी ब्रिग्जने नावाजलेला असा कातळकोरीव पायऱ्यांचा मानकरी किल्ले हरिहर उर्फ हर्षगड.


निरगुडपाडा गावातून जाताना उजव्या हाताला हरिहर उर्फ हर्षगडचा डोंगर दिसतो. त्याच डोंगराच्या मळलेल्या वाटेने गेल्यावर आपण तासाभरात एका पठारावर पोहोचतो. या पठारावर शेंदूर फासलेले अनगड देव दिसतात. याच वाटेने पुढे गेल्यावर आपण गगणाला भिडलेल्या कातळकोरीव पायऱ्यांसमोर येतो. काळ्या कातळात एका पाठोपाठ एक पायऱ्या कोरलेला हा दगडी जिन्याचा मार्ग एका वेळी एकच व्यक्ती वर चढू शकेल इतका अरुंद आहे. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस खोबण्या आहेत. त्यात हाताचा पंजा रोवून मागे वळून न बघता सावकाशपणे चढाई करावी. आपण पहिल्या प्रवेशद्वारात पोहोचतो. येथून खाली पाहताच खडा जिन्याचा मार्ग व खोल दरी याशिवाय काहीच दिसत नाही.
प्रवेशद्वाराजवळ गणेशाची मूर्ती आहे, तसेच उजव्या हाताला कातळ व डाव्या बाजूला दरी असा मार्ग तयार होतो व येथून वाकून चालत जावे लागते. पुढे कातळात खोदलेले दोन दरवाजे पार केल्यावर दगडी जिना लागतो. या मार्गाला हाताचा पंजा रोवण्यासाठी दोन्ही बाजूस खोबण्या आहेत, तसेच पुढे गेल्यावर आपण अंतिम प्रवेशद्वारात पोहोचतो.
तेथून पुढे गेल्यावर एक गुहा लागते. ते पाहून पुढे गेल्यावर तीन पाण्याची टाकी व एक तलाव लागतो. या तलावाच्या काठावर हनुमंताचे देऊळ व बाजूच्या खडकावर शिवलिंग व नंदी आहे. पुढे पायवाटेच्या उजव्या हातास ५०-६० फूट उंचीची टेकडी दिसते. ही टेकडी चढून गेल्यावर आपणास उत्तरेला वाघेरा तर दक्षिणेला वैतरणा दिसते व कावनाई, त्रिंगलवाडी किल्याचे डोंगर दिसतात. तर पूर्वेला कापड्या, ब्रह्मा व ब्रह्मगिरीचा किल्ला उर्फ त्र्यंबकगड दिसतो. पुन्हा आल्यावाटेने खाली उतरावे व पूर्वेकडे चालू लागायचे. तेथे गेल्यावर आपणास ५-६ कातळकोरीव टाकी व घुमटाकार माथा असलेली दगडी कोठी पाहायला मिळते. ही कोठी ३० फूट लांब व १२ फूट रुंद आहे.
येथे गडावर मुक्काम करायचा झाल्यास, आपण या कोठीत मुक्काम करू शकतो. इतिहासकाळात ही वास्तू दारूकोठार म्हणून ओळखली जात असे. येथून सरळ पूर्व टोकावर जावे, येथे दोन पाण्याच्या टाक्या आहेत, पण येथून ब्रह्मा डोंगर पाहावयास मिळतो. संपूर्ण गडफेरीस तीन ते चार तास लागतात. गड पाहून उतरताना काळजीपूर्वक उतरावे व जसे पायऱ्या चढलेले तश्याच उतराव्यात.
- ॅ५ुँंल्ल्िर१ॅी@ॅें्र’.ूङ्मे

किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा
निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. हे गाव खोंडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वरपासून २० कि.मी.वर निरगुडपाडा हे गाव आहे.
१कसारा किंवा नाशिकमार्गे इगतपुरी गाठावे. इगतपुरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी व निरगुडपाड्याला उतरावे.
२इगतपुरी-त्र्यंबकेश्वर-खोंडाळा या बसने कासुर्ली गावात उतरावे, हे गाव निरगुडपाडा गावाच्या पुढे आहे. या गावातूनही गडावर जाता येते. किल्ला चढाईसाठी साधारण अडीच ते तीन तास लागतात.

इतिहास
हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून, तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी, त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिंकला. पुढे तो मोगलांकडे गेला. मोरोपंत पिंगळे यांनी १६७० मध्ये हा गड जिंकून स्वराज्यात आणला. पुढे मोगल सरदार मातब्बरखानाने ८ जानेवारी १६८९ला हा किल्ला जिंकला. पुन्हा हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला व शेवटी १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला. खरे तर त्या वेळी किल्ल्यांकडे जाणाऱ्या वाटा उद्ध्वस्त करणे हे इंग्रजांचे धोरण होते,पण किल्ला अपवाद ठरला. कारण त्याच्या पायऱ्या या २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या असून अति उंच ठिकाणावर बांधल्यासारख्या वाटतात.

Web Title: Forts Harihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.