किल्ले ‘मालेगाव’

By Admin | Published: February 5, 2017 01:17 AM2017-02-05T01:17:04+5:302017-02-05T01:17:04+5:30

औरंगाबाद, साक्री, सुरत, नाशिक, धुळे, गाळणे या तत्कालीन स्थळांच्या मध्यवर्ती असलेला, गिरिणा (गिरिपर्णा) व मोक्षगंगा (मोसम) यांच्या संगमापासून एक मैल अंतरावर वसलेला,

Forts 'Malegaon' | किल्ले ‘मालेगाव’

किल्ले ‘मालेगाव’

googlenewsNext

- गौरव भंदिर्गे

औरंगाबाद, साक्री, सुरत, नाशिक, धुळे, गाळणे या तत्कालीन स्थळांच्या मध्यवर्ती असलेला, गिरिणा (गिरिपर्णा) व मोक्षगंगा (मोसम) यांच्या संगमापासून एक मैल अंतरावर वसलेला, तत्कालीन काळात खान्देशाची किल्ली म्हणून ओळखला जाणारा असा सरदार नारोशंकर राजेबहाद्दर निर्मित किल्ले मालेगाव.

इतिहास : मालेगावचा हा भुईकोट पेशव्यांचे सरदार नारोशंकर यांनी १७४० मध्ये बांधला. काहींच्या मते हा किल्ला १७६० मध्ये बांधला गेला असावा. नारोशंकरांना मोगल बादशहाने ‘राव बहाद्दूर’ ही पदवी दिली होती. इ. स. १७३० मध्ये नारोशंकर मल्हारराव होळकर यांच्या फौजेत होते. त्या वेळी पेशव्यांच्या वतीने ओरछा व झांसी येथे काम केले, परंतु नानासाहेब पेशव्यांनी त्यांना महाराष्ट्रात बोलावून घेतले. नारोशंकरांना दिल्लीच्या बादशहाकडून १७५७ साली इनाम म्हणून मिळालेल्या आठ गावांपैकी मालेगावात वाडा बांधण्यासाठी पेशव्यांकडे परवानगी मागितली व वाडा न बांधता भव्य भुईकोट किला बांधला.
हे पेशव्यांना आवडले नाही. म्हणून त्यांनी आपला एक खास दूत पाठवून किल्ला त्याच्या हवाली करावा अशी सूचना केली. पेशव्यांचा वकील किल्ल्याची वास्तुशांती होती त्याच दिवशी पोहोचला. नारोशंकर दुसऱ्या दिवशीच आपल्या कुटुंब कबिल्यासह किल्ल्यात राहायला जाणार होते. पण पेशव्यांचे पत्र मिळताच नारोशंकरांनी किल्ला दूताच्या हवाली केला व दूतासोबत एक पत्र पेशव्यांना पाठवले व त्यांची क्षमा मागून फक्त एक धार्मिक विधी करण्याची परवानगी पेशव्यांकडे मागितली. हे पत्र पाहताच पेशव्यांचा राग शांत झाला व त्यांनी नारोशंकरांना वास्तुशांती करून किल्ल्यात राहण्याची परवानगी दिली.
१८१८ मध्ये इंग्रजांच्या वतीने किल्ला घेण्यासाठी १३०० सैनिक व २५० बंदुकधारी घेऊन लेफ्टनंट मॅकडोवेल किल्ल्यावर चालून आला. तेव्हा किल्ल्यात अरबांची शिबंदी होती. इंग्रजांनी बरेच प्रयत्न करून काही उपयोग झाला नाही. या युद्धात इंग्रजांचे ३५ लोक ठार तर १७५ जण जखमी झाले. शेवटी दारूगोळ्याच्या कोठाराला आग लागल्यामुळे नाइलाजाने आतील अरबांनी १३ जून १८१८ रोजी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात दिला.

- : गडावर जाण्याच्या वाटा :-
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (माहुलीग्राम) ला पोहोचावे. तेथून रिक्षाने किल्ल्यासमोर यावे. मोसम पुलाच्या काठावर हा किल्ला असल्याने शोधण्यास काहीच अडचण येत नाही.

गडदर्शन
या किल्ल्याला तीन कोट होते. आतील कोट अतिशय मजबूत असून आजही नवीन कोटासारखा दिसतो. त्याच्या भोवताली खंदक व आत पुन्हा परकोट होता. त्यात घोड्यांची पागा होती, त्याची उंची १० फूट होती. आपण हा भग्न तट पाहून शेजारच्या चार अजस्र तोफा पाहाव्यात.
किल्ल्याच्या मध्यभागी काकणी महाविद्यालय भरते. त्यामुळे परवानगी घेऊन किल्ल्यात प्रवेश मिळतो. सुरुवातीला शाळेबाहेरून किल्ल्याच्या बाहेरील तट व इमारत यामधील प्रशस्त वाटेने फेरी मारून घ्यावी. या किल्ल्याच्या रक्षणासाठी नारोशंकरांनी बाराही महिने वाहत असलेल्या गिरणा व मोसम नदीच्या संगमावर भिंत बांधली. ते पाणी अडवून किल्ल्याच्या खंदकात येईल अशी व्यवस्था केली होती. सध्या खंदक पूर्ण बुजला आहे.
हे सर्व पाहून प्रवेशद्वारात यावे. शाळेच्या कार्यालयाबाहेरील भिंतीवर नारोशंकरांचे तैलचित्र आहे. शाळेच्या प्रशासनाने जो भाग शाळेच्या वापरात आहे तोच भाग खुला ठेवला आहे, उर्वरित भाग कुलूपबंद आहे. किल्ला आतून बघण्यासाठी विनंती केल्यावर आपणास कुलूप उघडून दिले जाते. येथे रंगमहाल असून डोळ्यांचे पारणे फेडणारे दोन भव्य दरवाजे दिसतात. भिंतीच्या आत बांधलेले भुयारी दगडी जिने, गडाच्या उत्तर बाजूचा भक्कम दरवाजा, पूर्व बाजूच्या दरवाजावर असणारी गच्ची व राजस्थानी किल्ल्यांची प्रतिकृती दाखवणाऱ्या नक्षीदार भव्य छत्र्या पाहायला मिळतात.

Web Title: Forts 'Malegaon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.