नऊ वर्षांत चार हजार बालकामगारांची सुटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 05:42 AM2019-02-25T05:42:08+5:302019-02-25T05:42:24+5:30
पोलिसांची आकडेवारी : तुटपुंजा पगारात घेतले जाते राबवून; दोन हजार मालकांना कोठडीची हवा
- मनीषा म्हात्रे
मुंबई : कोवळ्या हातांना अत्यल्प मजुरीवर दिवसरात्र राबविणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने मालकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे बालमजुरीला चाप बसण्यास मदत होत असून, गेल्या ९ वर्षांत ४ हजारांहून अधिक बालमजुरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये जवळपास २ हजार मालकांना कोठडीची हवा खावी लागली आहे.
बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांसह नेपाळमधून येणाºया बालमजुरांची संख्या अधिक असून, अवघ्या एक ते तीन हजार रुपयांसाठी ही मुले मुंबईत काम करतात. तुटपुंज्या पगारात त्यांना दिवसरात्र राबवून घेतले जाते.
घरकाम, हॉटेल, गॅरेज, जरीकाम, चामड्याचा व्यवसाय, प्लॅस्टिक, मोल्डिंगसह विविध लघुउद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना राबवून घेतले जाते. कमी पगारात, कमी खर्चात लहान मुलांकडून काम होत असल्यामुळे मालक बालमजुरांसाठी आग्रही असतात.
पोलीस वेळोवेळी अशा ठिकाणी धाडी टाकून बालमजुरांची सुटका करतात. त्यांना पुन्हा पालकांच्या हवाली करतात. मात्र, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ही मुले काही काळ गेल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी काम करताना दिसतात. यावर उपाय म्हणून शहरात कोणत्या परिसरात जास्तीत जास्त बाजमजूर काम करतात त्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. त्या-त्या परिसरात स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने समाजसेवा शाखेने छापे टाकण्यास सुरुवात केली.
मुंबईतून गेल्या ९ वर्षात ४ हजारांहून अधिक बालमजुरांची सुटका करण्यास पोलिसांना यश आले. यामध्ये गेल्या वर्षी ३५८ बालमजुरांचा समावेश होता, तर १९४ मालकांना कोठडीची हवा खावी लागली. त्यामुळे कायद्यातील बदलांमुळे मालकांवर चाप बसत आहे.
कायद्यातील सुधारणेमुळे वचक
मार्च २०१५ मध्ये बालमजूर विरोधी कायद्यात सुधारणा करत ३७० (१) कलमाचा समावेश करण्यात आला. हे कलम अजामीनपात्र असून किमान सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बालमजूर ठेवण्याआधीच सावध व्हावे.
कामाच्या ठिकाणी अनेक गैरसोयी
च्उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर बालमजूर नोकरीच्या शोधार्थ मुंबईत येतात.
च्आजवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६ ते १५ वयोगटातील लहान मुलांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांना अत्यल्प पगार दिला जातो.
च्मालक या लहान मुलांची एका खोलीत किंवा उद्योगाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करतो. मात्र राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेत अनेक गैरसोयी असल्याने या मुलांची हेळसांड होते.