संक्रमण शिबिरात चाळीस वर्षांचा वनवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:55 AM2017-08-11T06:55:01+5:302017-08-11T06:55:04+5:30
धोकादायक इमारत, प्रकल्पग्रस्त म्हणून संक्रमण शिबिरात कोंबले. हक्काच्या घरात जाण्याच्या प्रतीक्षेत एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल चाळीस वर्षे म्हाडाच्या संक्रमण शिबिरात काढण्याची वेळ घाटकोपरच्या पंतनगर येथील ४९६ कुटुंबांवर आली आहे.
मुंबई : धोकादायक इमारत, प्रकल्पग्रस्त म्हणून संक्रमण शिबिरात कोंबले. हक्काच्या घरात जाण्याच्या प्रतीक्षेत एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल चाळीस वर्षे म्हाडाच्या संक्रमण शिबिरात काढण्याची वेळ घाटकोपरच्या पंतनगर येथील ४९६ कुटुंबांवर आली आहे. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर असतानाच याच ठिकाणी हक्काच्या घरांसाठी त्यांनी लढा सुरू केला आहे.
घाटकोपर पूर्वेकडील पंतनगर परिसरात जवळपास म्हाडा संक्रमण शिबिराच्या ५० चाळी असून प्रत्येक चाळीत ८ खोल्या आहेत. २५ वर्षांपूर्वी येथील ८ चाळी तोडून त्या ठिकाणी इमारत उभी राहिली. या इमारतीत त्या रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले. तर उर्वरित ४२ चाळींत ४९६ कुटुंबे राहताहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही मंडळी चाळीस वर्षांपासून येथेच आहेत.
याच वसाहतीत राहत असलेले ७० वर्षांचे चंद्रकांत रत्नपारखी यांनी याच ठिकाणी घराला घर मिळावे म्हणून लढा उभारला. कामाठीपुरा परिसरात राहत असलेल्या पारखी यांचे १० आॅगस्ट १९७६ रोजी अवघ्या पाच वर्षांच्या करारावर या संक्रमण शिबिरात पुनवर्सन केले. मात्र हक्काच्या घरात जाण्याच्या प्रतीक्षेत २० वर्षे उलटली. अखेर त्यांनी पंतनगर संक्रमण शिबिर रहिवासी संघ स्थापन करत याच ठिकाणी घर मिळावे म्हणून पाठपुरावा सुरू केला. १९९७ मध्ये विकासक धर्मेश जैन यांच्या मदतीने त्यांनी म्हाडाकडे पुनर्विकासासाठी पाठपुरावा सुरू केला. म्हाडाकडून १९९९ मध्ये जैन यांना येथील भूखंड पुनर्विकासाठी देण्यात आला. पण काही कारणांमुळे म्हाडाने तो भूखंड २००६ मध्ये त्यांच्याकडून काढून घेतला. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये पुन्हा भूखंडाच्या पुनर्विकासाबाबत जैन यांच्या बाजूनेच अध्यादेश मंजूर झाला. याबाबत जैन यांच्याशी संपर्क साधला असता, तो झाला नाही.
रत्नपारखी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चाळीस वर्षांपासून मी येथे राहत आहे. या संक्रमण शिबिरात आयुष्य गेले. त्यामुळे याच ठिकाणी घराला घर मिळावे म्हणून २० वर्षांपासून लढत आहे. मात्र अजूनही हा लढा संपत नाही. प्रशासनाने दखल घेऊन आम्हाला फक्त याच ठिकाणी घराला घर द्यावे एवढीच विनंती. विकासक कोणीही असो, आम्हाला फक्त हक्काचे घर हवे. आता इथून पुढे पुन्हा दुसरीकडे राहणे शक्य नाही.
पुनर्विकासाच्या नावाखाली रस्त्यावर...
चाळीतून इमारतीत जाण्याचे स्वप्न रंगविले, विकासक आला. त्याने अवघ्या दोन वर्षांत इमारतीतील हक्काच्या घरात जाण्याचे स्वप्न दाखविले. मात्र हे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले, असे २० वर्षांपासून या संक्रमण शिबिरात राहत असलेल्या लीला चव्हाण यांनी सांगितले.
पुनर्वसन केलेल्यांचेही जीव धोक्यात...
संक्रमण शिबिरात बांधलेल्या दोन इमारतींची मोठी दुरवस्था झाली आहे. तेथील रहिवासी मेहताब शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीची कोणतीही दुरुस्ती किंवा देखभाल केलेली नाही. त्यामुळे ती कधीही कोसळू शकते. इमारतीचे भाग कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत.