१ कोटी किंमतीच्या जुन्या नोटा जप्त केल्याने शिरूर परिसरात खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 08:43 PM2019-06-12T20:43:42+5:302019-06-12T20:45:35+5:30

बिल्डरकडे बदलण्यासाठी नेत असलेल्या एक कोटी २६ हजार किमतीच्या बाद नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका कारमधील तीन व्यक्तींना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.

found 1 crore old currency in Shirur area | १ कोटी किंमतीच्या जुन्या नोटा जप्त केल्याने शिरूर परिसरात खळबळ 

१ कोटी किंमतीच्या जुन्या नोटा जप्त केल्याने शिरूर परिसरात खळबळ 

Next

 

पुणे  (शिरूर -कवठे येमाई) : बिल्डरकडे बदलण्यासाठी नेत असलेल्या एक कोटी २६ हजार किमतीच्या बाद नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका कारमधील तीन व्यक्तींना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांची दैनंदिन फेरी सुरु असताना त्यांना एका कारचा संशय आला. त्यावेळी अधिक तपास केला असताना त्यात एक कोटी रुपयांच्या चलनात बंद झालेल्या पाचशे व एक हजार रूपयांच्या नोटा मिळून आल्या. या नोटा जप्त केल्या असून या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

           गणेश शिवाजी कोळेकर ( वय २५, रा. संविदणे, शिरूर ), समाधान बाळू नरे ( वय २१, रा. आमदाबाद, शिरूर ) व अमोल देवराम दसगुडे अशी अटक व्यक्तींची नावे आहेत. पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सारंगकर हे मध्यरात्री पोलिस हवालदार चौधरी, वाहनचालक हराळ यांच्यासमवेत पोलिस वाहनामध्ये कवठे येमाई येथे पेट्रोलिंग करीत असताना रस्त्याच्या कडेला एक कार संशयितरित्या आढळली. त्यावेळी त्यांनी कारची तपासणी केली. कारमध्ये उपरोक्त तिघे जण होते. कार चालकाच्या सिटमध्ये एक बॅग मिळाली. बॅग उघडून तपासली असता त्यामध्ये नोटाबंदीच्या चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे व एक हजार रूपयांच्या एक कोटी २६ हजारांच्या नोटा आढळून आल्या. या नोटा कोठून मिळाल्या, कुठे घेऊन जात होता अशी पोलिसांनी  चौकशी केली असता, ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. नरे याने 'नोटाबंदी झाली त्या कालावधीत पिरंगुट येथील बिल्डर परेश शिरोळे यांच्याकडून या नोटा बदलून देण्यासाठी आणल्या होत्या. मात्र त्यांच्या कड्न नोटा बदली होऊ शकल्या नाही. या नोटा पुन्हा शिरोळे यांना देण्यासाठी चाललो होतो 'असे पोलिसांना सांगितले आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या नोटा बदलून का घेतल्या नाहीत आणि त्या कोणाच्या मालकीच्या आहेत या संदर्भात पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.नोटबंदीला दोन वर्ष उलटूनही एवढ्या मोठ्या संख्येने नोटा मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

Web Title: found 1 crore old currency in Shirur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.