भंडारदरा धरणात बुडालेल्या मुंबईच्या डबेवाल्या तरुणाचा मृतदेह सापडला
By Admin | Published: March 20, 2017 05:55 PM2017-03-20T17:55:34+5:302017-03-20T17:55:34+5:30
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणात रविवारी सायंकाळी पोहताना पाण्यात बुडालेल्या मुंबईच्या कल्याण येथील डबेवाल्या युवकाचा मृतदेह सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सापडला
लोकमत आॅनलाईन
अहमदनगर, दि. २०- अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणात रविवारी सायंकाळी पोहताना पाण्यात बुडालेल्या मुंबईच्या कल्याण येथील डबेवाल्या युवकाचा मृतदेह सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सापडला. जितेंद्र जयराम गायकर (वय २७) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा आनंदरा,ब्राह्मणवाडा (ता. अकोले) येथील रहिवासी आहे.
मुतखेलचे पोलीस पाटील देवीदास इदे व संजय महानोर यांनी दिलेल्या माहितीनुसार भंडारदरा धरणाच्या पर्यटनासाठी मुंबई येथून जितेंद्र हा संतोष अर्जुन गोंदके, दिलीप विठ्ठल गायकर, गोपाळ महादू इदे, शरद गंगाधर मोरे या मित्रांसह आला होता. हे सर्व मुंबईत डबेवाल्यांचे काम करतात. कल्याणहून रविवारी सकाळी ते भंडारदरा येथे आले होते. मूतखेल येथीलच गोपाळ इदे या स्थानिक तरूणाच्या घरी गेले. तेथून चार वाजता मूतखेलच्या बाजूला धरणाच्या पाण्यात ते आंघोळीसाठी उतरले. जितेंद्रला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे पुढे पुढे सरकत खोलीच्या दिशेने गेला. त्याला पोहता येत असल्यामुळे त्याच्या मित्रांना तो पाण्यात बुडेल असे न वाटल्याने बाकीचे तरुण पाण्याबाहेर आले. पण थोड्या वेळानंतर जितेंद्र्र पाण्याबाहेर का येत नाही?, म्हणून सोबतच्या तरुणांनी पुन्हा पाण्यात उतरून त्यााचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा शोध लागला नाही. त्यामुळे गावातील स्थानिक पोहणारे व पोलीस पाटील यांच्या मदतीने राजूर पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच पोलीस नाईक आर के.वाकचौरे, के.एल.तळपे काँस्टेबल पी.व्ही.थोरात, एस.एस.कदम व अजय आठरे घटनास्थळी पोहोचले. स्थानिक पोहण्यात तरबेज बाजीराव बनसोडे,रमेश मधे,सरपंच जयराम इदे,तंटामुक्तीचे अध्यक्ष नरहरी इदे तसेच चिचोंडी येथून बोलावलेल्या इतर तरूणांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. मात्र रविवारी सांयकाळी उशिरापर्यंत जितेंद्रचा शोध लागला नव्हता. शोध न लागल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क वर्तविण्यात येत होते.
सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मूतखेल आश्रम शाळेमागे धरणाच्या पाण्यातून त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. राजूर येथे शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत जितेंद्र गायकर याला एक पाच वर्षांचा मुलगा आहे. आई-वडील प्रतिकूल परिस्थितीत राहत असून जितेंद्रच्या मृत्यूने आनंदरा वाडीवर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी पंचनामा करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली. सहायक पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वाकचौरे पुढील तपास करीत आहेत.