चार बालगोविंदा रुग्णालयात दाखल
By Admin | Published: August 27, 2016 01:41 AM2016-08-27T01:41:23+5:302016-08-27T01:41:23+5:30
यंदा दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या बालगोविंदांपैकी ४ बालगोविंदा जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले
मुंबई : यंदा दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या बालगोविंदांपैकी ४ बालगोविंदा जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
उल्हासनगरमध्ये दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या १२ वर्षीय सुजल गडापकर याला जबर मार बसला आहे. हंडी फोडताना पडल्यामुळे सुजलच्या डोक्याला आणि छातीला मार बसला आहे. प्राथमिक उपचार झाल्यावर त्याला पुढील उपचारांसाठी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री उशिरा सीटीस्कॅन आणि अन्य काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे समजते.
जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये १३ आणि १५ वर्षांच्या बालगोविंदांवर सध्या उपचार सुरू आहेत. १५ वर्षीय हिमांशू पटेल याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर १३ वर्षीय गणेश याच्या डोक्याला आणि डोळ्याला मार बसला आहे. डोक्याला मार बसला असल्यामुळे त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली. (प्रतिनिधी)
नऊ वर्षांचा धीरज हा बुधवारी रात्रीच जखमी झाला आहे. धीरजला उपचारांसाठी कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री सराव शिबिरात दहीहंडी फोडताना त्याच्या डोक्याला मार लागला. चाचण्यांनंतर त्याच्या कवटीला फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले आहे.