पिता-पुत्रासह चौघांना अटक
By admin | Published: April 25, 2017 02:01 AM2017-04-25T02:01:21+5:302017-04-25T02:01:21+5:30
विविध बँकांतून कोट्यवधींची कर्जे घेऊन २१०७ कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी नाकोडा कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक बी.जी. जैन यांच्यासह
मुंबई : विविध बँकांतून कोट्यवधींची कर्जे घेऊन २१०७ कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी नाकोडा कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक बी.जी. जैन यांच्यासह चौघा जणांना केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्यांचा मुलगा व कंपनीचा संचालक डी.बी. जैन, लेखा परीक्षक जे.सी. सोमानी व पुनीत रुगंठा अशी अन्य तिघांची नावे आहेत. सोमवारी न्यायालयात हजर केले असता सर्वांना पाच दिवसांची कोठडी मिळाली.
मे. नाकोडा कंपनीतर्फे पॉलिस्टर, फायबर आदींचे उत्पादन करण्यात येत असून, सुरत येथील सिल्वासा व करज या ठिकाणी त्याच्या फॅक्टरी आहेत. कंपनीने व्यवसायासाठी कॅनरा बँक या प्रमुख बँकेसह विविध १३ बँकांकडून एकत्रित निधी (कान्सरटियम फंड) २१०७ कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र त्याची परतफेड न करता कर्ज बुडविल्याने कॅनरा बँकेने या कंपनीविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार सीबीआयच्या पथकाने रविवारी जैन पिता-पुत्रांसह चौघांना अटक केली. रुगंठा हा सुरत येथील रहिवासी असून, कर्ज मिळवून देण्यात त्याने मध्यस्थाची भूमिका बजाविली होती, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची माहिती घेण्यात येत असून, त्यांनी कोणकोणत्या कंपन्यांच्या खात्यांवर रक्कम वर्ग केली आहे, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)