भाजपाच्या चार खासदारांना डच्चू; पुण्यातून गिरीश बापट यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 04:59 AM2019-03-24T04:59:24+5:302019-03-24T04:59:49+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये चार विद्यमान खासदारांना डच्चू देण्यात आला आहे. त्यात अनिल शिरोळे (पुणे), हरिश्चंद्र चव्हाण (दिंडोरी) ए.टी.नाना पाटील (जळगाव) आणि शरद बनसोडे (सोलापूर) यांचा समावेश आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये चार विद्यमान खासदारांना डच्चू देण्यात आला आहे. त्यात अनिल शिरोळे (पुणे), हरिश्चंद्र चव्हाण (दिंडोरी) ए.टी.नाना पाटील (जळगाव) आणि शरद बनसोडे (सोलापूर) यांचा समावेश आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही यादी जाहीर करण्यात आली.
पुण्यातून अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना भाजपाने उमेदवारी दिली. जळगावमध्ये स्मिता वाघ यांना, दिंडोरीमध्ये कालच राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवार यांना तर सोलापुरातून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली. पवार या २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. बापट की शिरोळे असा घोळ गेले काही दिवस सुरू होता. शेवटी भाजपा श्रेष्ठींनी बापट यांच्या बाजूने कौल दिला. जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ या विधान परिषदेच्या सदस्य असून त्यांचे पती उदय वाघ हे भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आहेत. भाजपाने आतापर्यंत सहा खासदारांना उमेदवारी नाकारली आहे. त्यात दिलिप गांधी (अहमदनगर) आणि सुनील गायकवाड (लातूर) यांचाही समावेश आहे.
काँग्रेसने पाच उमेदवार शुक्रवारी मध्यरात्रीनंतर जाहीर केले. त्यात चंद्रपूर - विनायक बांगडे, जालना - विलास औताडे, औरंगाबाद - सुभाष झांबड, भिवंडी - माजी खासदार सुरेश टावरे आणि लातूर - मच्छिंद्र कामंत यांचा समावेश आहे. २०१४ च्या निवडणुकीत चंद्रपूरमध्ये संजय देवतळे, जालना - विलास औताडे भिवंडी - विश्वनाथ पाटील, औरंगाबाद - नितीन पाटील तर लातूरमध्ये दत्तात्रय बनसोडे हे काँग्रेसचे उमेदवार होते. या सहाही जागा काँग्रेसने गमावल्या होत्या.