चौघांचे रक्तनमुने मुंबईच्या प्रयोगशाळेत
By Admin | Published: December 7, 2014 01:28 AM2014-12-07T01:28:15+5:302014-12-07T01:28:15+5:30
जवखेडे हत्याकांडप्रकरणी शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलेल्या एकाला चौकशी करून सोडून देण्यात आले
जवखेडे हत्याकांड : एक सोडला, दुसरा ताब्यात
अहमदनगर/पाथर्डी : जवखेडे हत्याकांडप्रकरणी शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलेल्या एकाला चौकशी करून सोडून देण्यात आले असून, चौकशीसाठी आणखी एकाला शनिवारी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रंनी दिली़ याशिवाय जवखेडे खालसा परिसरातील चौघांचे रक्तनमुने घेऊन ते तपासणीसाठी मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडात सहभागी असलेला प्रशांत जाधव सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्याच्याकडे होत असलेल्या चौकशीतूनच पोलिसांना हत्याकांडातील धागेदोरे मिळत आहेत. प्रशांतकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस तपासाची पुढील दिशा ठरवित आहेत. प्रशांतचा अगदी जवळचा नातेवाईक पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतला होता. त्याची रात्रभर कसून चौकशी झाली. मात्र,त्याला अटक न करता पोलिसांनी सोडून दिले. त्याच्याकडून बरीचशी माहिती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान,शनिवारी आणखी एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेला जवखेडे खालसा परिसरातील असून जाधव कुटुंबाशी संबंधित आहे.
दरम्यान,पोलिसांचे एक पथक जवखेडे खालसा गावाजवळ आले होते. त्यांनी एक महिला व एका तरुणाला ताब्यात घेतले. तसेच प्रशांतच्या जवळच्या दोन नातेवाईकांना ताब्यात घेतले होते. त्यामध्ये एक तरुण व एक महिला होती.
चौघांची चौकशी करून त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे चौघांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आणि त्यांना सोडून देण्यात आले. घेतलेले रक्ताचे नमुने मुंबई येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान,याबाबत पोलीस अधिका:यांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. (प्रतिनिधी)
संशयित फरार
च्या घटनेमध्ये अन्य काही संशयित आहेत. त्यांची नावे पोलिसांच्या रडारवर येताच त्यांनी जवखेडे खालसा सोडले असून ते फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर असल्याचे समजते. काही संशयित मुंबईमध्ये असल्याची माहिती आहे.