खासगी बस उलटून चौघांचा मृत्यू
By admin | Published: July 8, 2016 09:50 PM2016-07-08T21:50:28+5:302016-07-08T21:50:28+5:30
वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा परिसरात नागपूरहून वर्धेकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरचालकाने वर्धेहून नागपूरकडे येणाऱ्या खासगी बसला कट मारला
१२ जण जखमी : टाकळघाट फाटा परिसरातील अपघात
टाकळघाट (नागपूर) : नागपूर - वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा परिसरात नागपूरहून वर्धेकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरचालकाने वर्धेहून नागपूरकडे येणाऱ्या खासगी बसला कट मारला. त्यामुळे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रोडच्या कडेला उलटली. यात चौघांचा मृत्यू झाला असून, १२ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बसचालक व वाहकाचा समावेश आहे. ही घटना एमआयडीसी (बुटीबोरी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा परिसरात शुक्रवारी घडली.
कोमल ज्ञानेश्वर तेलरांधे (२९, रा. केळझर, जिल्हा वर्धा), विलास मारोतराव गुळे (४०, रा. सावंगी, आसोला, जिल्हा नागपूर), बसचालक मंगेश दामोदर सालोडकर (२२, रा. पेंढरी, मध्य प्रदेश) व वाहक मारोती तुळशीराम काळबांडे (४०, रा. रामबाग, नागपूर),अशी मृतांची नावे आहे. हे सर्वजण एमएच-३२/बी-४२२१ क्रमांकाच्या खासगी बसने वर्धेहून नागपूरला येत होते. या बसमध्ये अंदाजे २० प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातामुळे घटनास्थळाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागपूर - वर्धा मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती.