समीरसह चौघांची ‘इन कॅमेरा’ चौकशी

By admin | Published: September 19, 2015 12:33 AM2015-09-19T00:33:18+5:302015-09-19T00:45:01+5:30

महत्वाचे धागेदोरे हाती : तपास प्रमुख संजयकुमार कोल्हापूरात तळ ठोकून; संशयितांकडे कसून चौकशी

Four cameras 'in camera' inquiry with Samir | समीरसह चौघांची ‘इन कॅमेरा’ चौकशी

समीरसह चौघांची ‘इन कॅमेरा’ चौकशी

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यासह ताब्यात घेतलेल्या त्याच्या प्रेयसीसह दोघा जवळच्या नातेवाइकांची ‘इन कॅमेरा’ चौकशी सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशीमध्ये पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.
तीन दिवसांपासून तपास प्रमुख व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. पोलीस मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कक्षामध्ये संशयित गायकवाड याला ठेवण्यात आले आहे; तर त्याच्या प्रेयसीसह दोघा नातेवाइकांना तिसऱ्या मजल्यावरील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्षात ठेवले आहे. या दोन्हीही कक्षांमध्ये स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी संशयितांकडे कसून चौकशी सुरू होती. संशयितांना विचारलेल्या प्रश्नांसह त्यांनी दिलेल्या उत्तरांची थेट संगणकावर नोंद केली जात होती. तसेच या चौकशीचे व्हिडीओ चित्रीकरण केले जात आहे. जितके भक्कम पुरावे गोळा करता येतील, त्या दृष्टीने पोलीस प्रयत्न करीत आहेत. (प्रतिनिधी)


अशी होतेय चौकशी...
तपासप्रमुख संजयकुमार हे शासकीय विश्रामगृहावर गेल्या तीन दिवसांपासून वास्तव्यास आहेत. ते सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत पोलीस मुख्यालयात बसून तपासाची माहिती घेतात. त्यानंतर पुन्हा सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत संशयितांकडे चौकशी करतात.
त्यानंतर आरोपीला जेवण दिल्यानंतर पुन्हा त्याच्याकडे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व अन्य अधिकारी, कर्मचारी मध्यरात्री दोनपर्यंत चौकशी करतात. त्यानंतर संशयितांना झोपण्यास सांगून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नऊनंतर चौकशीला सुरुवात होते.
संशयितांसोबत व आजूबाजूला चोवीस तास आठ ते दहा सध्या वेशातील सशस्त्र कर्मचारी आजूबाजूला लक्ष ठेवून आहेत. लघुशंकेसाठी व शौचालयास जाताना त्यांच्यावर चौघे पोलीस पाळत ठेवून असतात. संशयित गायकवाडच्या प्रेयसीकडे सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील चौकशी करीत आहेत.

जेवणासह चहा-नाष्ट्याची सोय
संशयित समीर गायकवाडसह त्याच्या प्रेयसीला दोनवेळचे जेवण, चहा-नाष्टा पोलिसांकडून पुरविला जात आहे. गायकवाड याची रोजच्या रोज वैद्यकीय तपासणी केली जात आहे. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गायकवाडच्या प्रेयसीसह तपास अधिकाऱ्यांना महिला कॉन्स्टेबल चहा घेऊन जात होती; परंतु प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दिसताच तिने पुन्हा मागे वळून दुसऱ्या कॉन्स्टेबलकडून चहा आत पाठविला.

‘सायबर सेल’चे पथक पुण्याला परतले
पुणे येथील ‘सायबर सेल’चे चौघा तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले होते. संशयित गायकवाड याच्याकडून २३ मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलवरून व ई-मेल आणि फेसबुकवरून त्याने आतापर्यंत कोणते संदेश (मेसेज) पोस्ट केले आहेत, त्याची माहिती या पथकाने पोलीस मुख्यालयातील सायबर सेलमध्ये बसून तपासली. त्यामधील काही माहिती सोबत घेऊन ते दुपारी पुण्याला परतले.

बंदीही घाला : शहीद गोविंद पानसरे समता संघर्ष समितीची मागणी

‘सनातन’ला देशद्रोही घोषित करा

कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी अटक केलेला समीर गायकवाड हा संशयित आरोपी ‘सनातन’ संस्थेचा साधक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या संस्थेला देशद्रोही संघटना म्हणून घोषित करून बंदी आणावी, अशी मागणी शुक्रवारी शहीद गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी अमित सैनी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत राज्य शासनाला कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
स्मिता पानसरे यांच्या नेतृत्वाखालील व्यापक शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी केली.
यावेळी सतीशचंद्र कांबळे म्हणाले, सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडविले आहेत. त्याचबरोबर ‘सनातन’च्या लिखाणाची पद्धत शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विरोधी आहे.
चंद्रकांत यादव म्हणाले, ‘सनातन’चे काम हे संविधानविरोधी असून, ते लोकशाहीसाठी मारक आहे. त्यामुळे या संस्थेवर बंदी घातली पाहिजे. यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन या संदर्भात विधिमंडळ सभागृहात प्रश्न मांडण्याची मागणी करू.
नामदेव गावडे म्हणाले, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
गिरीष फोंडे म्हणाले, ‘सनातन’ला देशद्रोही घोषित करून जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात या संस्थेच्या पुस्तक स्टॉल्सवर बंदी घालावी.
निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्मिता पानसरे म्हणाल्या, आतापर्यंत आम्ही सनातन संस्थेबाबत आक्षेप घेत होतो. परंतु, आता पोलीस प्रशासनाने या संस्थेच्या कार्यकर्त्यालाच अटक केल्याने ते स्पष्ट झाले आहे. या संस्थेचा कारभार हा काही मूठभर हिंदंूचे हित साधणारा आहे. धर्मभोळ्या व देवभोळ्या हिंदू समाजातील लोकांची माथी भडकाविण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. बहुजनांचे केवळ धड असून, माथी ही दुसऱ्याचीच आहेत. परंतु, येथून पुढील काळात बहुजनांच्या धडावर बहुजनांचीच डोकी राहतील, यासाठी रस्त्यावरची धारदार लढाई केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांचे मौन पाहता त्यांची विचारधारा ही ‘सनातन’सारखीच असल्याने त्याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, ज्येष्ठ नेते पानसरे हे आमच्यासाठी आदरनीय आहेत. त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्याचे वकीलपत्र कोल्हापूरसह सहा जिल्ह्णांतील वकील घेणार नाहीत. या संस्थेवर बंदी घालून राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करावा.
शिष्टमंडळात रघुनाथ कांबळे, बन्सी सातपुते, शिवाजीराव परुळेकर, संभाजी जगदाळे, अनिल चव्हाण, आशा कुकडे, उमेश पानसरे, तौफिक मुल्लाणी, मधुकर माने, अण्णा मालेकर, रियाज शेख, प्रदीप कवाळे, दिलदार मुजावर, जमीर शेख, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

निवेदनातील मागण्या ...
पानसरे यांच्या हत्येचा तपास त्वरित करून समीर गायकवाडच्या मागील सूत्रधार, संस्था व राजकीय प्रेरणा यांचा तपास करून कडक शिक्षा द्यावी.
खुनाचा तपास राजकीय हस्तक्षेपविरहित व शहीद हेमंत करकरेंच्या कार्यपद्धतीने व हायकोर्टाच्या निगराणीखाली व्हावा.
यापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार व अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची राज्य सरकारने बदली करून तपासात हस्तक्षेप केला आहे. आता तपासात गती घेतली असताना त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप झाल्यास असंतोष निर्माण होईल.
बहुसंख्याक धर्माच्या नावाने राज्यघटनाविरोधी कारवाया करून सहिष्णू भारतीय संस्कृतीला बदनाम करणाऱ्या हिंदू जनजागरण समिती, हिंदू राष्ट्र सेना, बजरंग दल, श्रीराम सेना, शिवप्रतिष्ठान, दुर्गा वाहिनी या संघटनांबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढावी.

Web Title: Four cameras 'in camera' inquiry with Samir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.