खारघरमधून चार बालकामगारांची सुटका
By admin | Published: October 8, 2016 01:54 AM2016-10-08T01:54:38+5:302016-10-08T01:54:38+5:30
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खारघर येथून चार बालकामगारांची सुटका केली.
नवी मुंबई : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खारघर येथून चार बालकामगारांची सुटका केली. तर ज्याठिकाणी ते काम करत होते त्या बेकरीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सुटका केलेल्या बालकांची त्याठिकाणी पिळवणूक झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.
बालकामगार बंदी असतानाही अनेक ठिकाणी त्यांना राबवून घेतले जाते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व कामगार उपआयुक्त रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगारांच्या सुटकेसाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण, उपनिरीक्षक रुपाली पोळ, संजय क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी खारघरमध्ये तपास केला.
हॉटेल्स, बेकरी यासह ज्याठिकाणी बालकामगारांचा वापर होवू शकतो अशा संशयित ठिकाणांची पाहणी केली असता, बेंगलोर अयंगार बेकरीत चार बालकामगार आढळून आले. या बालकामगारांची पिळवणूक करून मजुरी करून घेतली जात होती. त्यानुसार बेकरी मालक कविश शेट्टी (३०), सुजित म्हात्रे (३९) व रमेश चौधरी यांच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)